भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडीओ ट्वीट करत सडकून टीका केली आहे. अतुल भातखळकरांनी “अस्सलाम वालेकुम लाचारांनो” असं म्हणत शिवसेनेला नवाब सेना म्हटलं. मागील काही दिवसांपासून भाजपा आणि ठाकरे गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता या नव्या टीकेने पुन्हा राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
अतुल भातखळकर म्हणाले, “ही ज्वलंत हिंदुत्वाचा वसा सांगणाऱ्या जनाब सेनेची सभा चालली आहे. अस्सलाम वालेकुम लाचारांनो.”
व्हिडीओत सुषमा अंधारेंनी नेमकं काय म्हटलं?
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पोस्ट केलेला सुषमा अधारेंचा हा व्हिडीओ एका सभेतील आहे. या सभेत अंधारे उपस्थितांसमोर कुराणविषयी बोलताना दिसत आहेत. त्या म्हणतात, “कुराण शरीफमध्ये सांगितलं आहे की, इस्लाममध्ये पाच कर्तव्य सांगितली आहेत. खरा मुस्लीम तोच असतो जो दिवसात पाचवेळा नमाज पठण करतो.”
हेही वाचा : “बाप हा शेवटी बापच असतो, जुना बाप किंवा…”, शिवसेना नेत्याचं कोल्हापुरात वक्तव्य
“दुसरं कर्तव्य रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे पाळणे हे आहे. तिसरं कर्तव्य आपल्या कमाईतील २० टक्के जकातमध्ये देणे, चौथं कर्तव्य आयुष्यात एकदा हजला जाणं आणि पाचवं कर्तव्य म्हणजे जेव्हा अल्लासमोर तुमच्या कामांचा हिशोब द्यायची वेळ येईल तेव्हा तुमची मान लज्जेने खाली झुकायला नको,” असं सुषमा अंधारे उपस्थितांना सांगत आहेत.