भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी एक फोटो ट्विट केला आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होतो आहे. हा फोटो आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा. राष्ट्रध्वजासमोर हे दोघंही उभे आहेत. मात्र मल्लिकार्जुन खर्गे उन्हात उभे आहेत आणि सोनिया गांधींच्या डोक्यावर छत्री धरण्यात आली आहे. त्यावरून अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केलं आहे.
काय आहे अतुल भातखळकर यांचं ट्विट?
“राजाचं घर उन्हात…काँग्रेस संस्कृतीची दिवाळखोरी अध्यक्ष उन्हात नि मॅडमसाठी छत्री” असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. त्यानंतर आता त्यांना यावरून चांगलंच ट्रोल केलं जातं आहे. तसंच हा फोटो चांगलाच व्हायरलही झाला आहे. अनेकांनी या फोटोवरून अतुल भातखळकर यांना चांगलंच सुनावलं आहे. सोनिया गांधी या आजारी आहेत त्यांच्याविषयी अशी पोस्ट तुम्ही कशी काय करता? असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला आहे.
अतुल भातखळकर यांना काय सुनवत आहेत लोक?
काँग्रेसमध्ये राजेशाही नाही असं एका नेटकऱ्याने सुनावलं आहे. तर एका नेटकऱ्याने अतुल भातखळकर तुम्ही आत्मचिंतन करा त्याची तुम्हाला गरज आहे असं म्हटलं आहे. तुमचे विचार पाहून असं वाटतं आहे की तुमचा आणि स्त्री सन्मानाचा दुरान्वये काही संबंध नाही असंही एकाने म्हटलं आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर हे कायमच काँग्रेसवर टीका करत असतात. त्यांनी आता एक फोटो ट्विट केला आहे त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आला आहे.