सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला १५ दिवसांत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करायचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षण गेल्याची तीव्र भावना व्यक्त होत असताना त्यावरून विरोधी पक्षांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केल्याची टीका भाजपाने केली आहे. यासंदर्भात जालन्यातील मंठा शहरात नागरिकांशी बोलताना भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. त्यांनी आक्षेपार्ह भाषेत राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या विधानावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
“सरकारचे बदमाश, लफंगे मंत्री”
“इम्पिरिकल डाटा तयार करून, ट्रिपल टेस्ट करून ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली असती तर हजार टक्के ओबीसी आरक्षण वाचलं असतं. पण हे सरकार आणि या सरकारमधले बोलघेवडे, खोटारडे, बदमाश, लफंगे मंत्री यांना समुद्रात बुडवलं पाहिजे. ही खोटारडी औलाद सातत्याने सांगत होती की मोदींनी, केंद्र सरकारने आम्हाला डेटा दिला पाहिजे”, असं बबनराव लोणीकर म्हणाले.
“मनमोहन सिंग सरकारच्या काळात डेटा गोळा केला”
“मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते. दिल्लीत, महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती. सगळा देश काँग्रेसच्या ताब्यात होता. तेव्हा हा सर्वे झाला होता. त्यात ६९ हजार चुका होत्या. तो डाटा कधीच मनमोहन सिंग सरकारने कुठल्या राज्याला दिला नाही. काँग्रेसने ५० वर्षांच्या हयातीत तो डाटा बाहेर काढला नाही. पण राज्यातले ओबीसी मंत्री देखावा निर्माण करत आहेत. रुमाल गळ्यात घालून भाषणं करत आहेत. माध्यमांमध्ये बोलत आहेत”, असं देखील लोणीकर यावेळी म्हणाले.
“तुम्ही गावागावात जाऊन सांगा की..”
यावेळी बोलताना लोणीकर यांनी उपस्थित नागरिकांना सरकारबद्दल गावागावात सांगण्याचं आवाहन केलं आहे. “तुम्ही गावागावात जाऊन सांगा की ही बेईमान औलाद आहे. हिरव्या हराळीमध्ये साप दिसत नाही. हा महाराष्ट्रातला तीन पक्षांचा विषारी साप किती विषारी आहे हे गावागावात समजावून सांगावं लागेल”, अशा शब्दांत लोणीकरांनी टीका केली आहे.