राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केली. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यावर राष्ट्रवादीसह इतर अनेक पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या. आता भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत सूचक विधान केलं आहे. तसेच शरद पवारांनी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको, असं नमूद केलं.
राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण होणार?
राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण होणार? असा प्रश्न विचारला असता सुरेश धस म्हणाले, “राष्ट्रवादीचा भावी अध्यक्ष कोण होणार हा विषय थोडा मोठा आहे. शरद पवारांनी राजीनामा दिला आहे. इतर कुणालातरी अध्यक्ष करावं, असं त्यांनी सांगितलं आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही भाजपाचे लोक आहोत. त्यामुळे त्यावर आम्ही बाहेरच्या लोकांनी बोलणं उचित होणार नाही.”
“शरद पवारांची निवृत्ती इतक्या लवकर होऊ नये”
“मी राष्ट्रवादीच्या जवळ होतो. मलाही निश्चितपणे वाटतं की, शरद पवारांची निवृत्ती इतक्या लवकर होऊ नये. आणखी काही दिवस त्यांनी काम केलं तरी काही हरकत नाही,” असं मत सुरेश धस यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला नाही तर? अनिल देशमुख म्हणाले, “आम्ही सर्वजण…”
अजित पवारांचा एक गट भाजपात जाण्यास उत्सूक, राऊतांच्या वक्तव्यावर सुरेश धस म्हणाले…
अजित पवारांचा एक गट भाजपात जाण्यास उत्सूक असल्याच्या चर्चांवर सुरेश धस म्हणाले, “संजय राऊत फार मोठे नेते आहेत. त्यांच्यावर मी काय बोलू? अजून कुठंच कशातच काही नाही. राष्ट्रवादीत गट असेल असं मला वाटत नाही. शरद पवार आणि अजित पवार हे दिसायला वेगवेगळे दिसतील, परंतु ते वेगळे नाहीत, असं माझं मत आहे.”