Arangzeb Tomb in Maharashtra: विश्व हिंदू परिषदेने शिवजयंतीच्या निमित्ताने आजपासून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठीच्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील काही नेतेमंडळींनीही तशा प्रकारची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे तेलंगणातील आमदार टी. राजा यांनी पुण्यात बोलताना औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात विधान केलं आहे. भारत हिंदू राष्ट्र बनवण्याचा आपला संकल्प असल्याचं सांगतानाच टी. राजा यांनी यावेळी औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत भूमिका मांडली आहे.
“औरंगजेबाची कबर राज्यातून हटवण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्रातील हिंदू करत आहेत. कधी हटणार औरंगजेबाची कबर? माझा आता एकच संकल्प आहे, भारत हिंदू राष्ट्र बनवणं आणि औरंगजेबाची कबर इथून हटवणं”, असं टी राजा यावेळी म्हणाले. फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील हिंदूंचा हाच प्रश्न आहे, असाही दावा राजा यांनी केल्याचं एएनआयच्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
औरंगजेबाची कबर म्हणजे विषारी तलवार – टी. राजा
“औरंगजेबानं त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकलं. सख्ख्या भावांना ठार केलं आणि आपली मंदिरं उद्ध्वस्त केली. त्याची महाराष्ट्रातली कबर ही एखाद्या विषारी तलवारीसारखी आहे. आधी फक्त महाराष्ट्रातले हिंदू कबरीबाबत विचारणा करत होते. आता अवघ्या देशातले हिंदू विचारत आहेत की औरंगजेबाची कबर अजूनही इथे का आहे?” असा उल्लेख टी. राजा यांनी यावेळी केला.
“कबरीवर कारसेवा होणार असेल तर माझं समर्थन”
दरम्यान, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवर कारसेवा करण्याची इच्छा बोलून दाखवली असून त्याला आपलं समर्थन असल्याचं राजा म्हणाले. “जर सरकार ही कबर हटवू शकत नसेल, तर आम्ही तिथे कारसेवा बजावू असं ते म्हणाले आहेत. माझं त्याला समर्थन आहे”, असं टी. राजा म्हणाले.
काँग्रेसचा हल्लाबोल
दरम्यान, काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावरून विहिंप व बजरंग दलावर टीकास्र सोडलं. “विहिंप व बजरंग दल यांच्याकडे काहीही काम उरलेलं नाही. महाराष्ट्रातील जनतेनं शांततेत राहावं असं त्यांना वाटतच नाही. त्यांना राज्याच्या विकासाची गती कमी करायची आहे. मला त्यांना सांगायचंय की औरंगजेब इथे २७ वर्षं होता. पण त्याला इथे काहीही करता आलं नाही. मग आता त्याची कबर इथून हटवून काय साधणार आहे?” असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.