भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला फटकारलं होतं. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला, हे दुर्दैवी आहे. आव्हाडांवर लावलेली कलमे चुकीची आहे, असं पाटील म्हणाले होते.
पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर केला जात आहे. पोलीस बुद्धी गहाण ठेवून विरोधकांवर कारवाई करत आहेत. असाच गैरवापर होत राहिला तर सर्व सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास उडेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितलं होतं. यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर सडकून टीका केली आहे.
हेही वाचा : “उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासण्याची गरज”, भाजपा आमदाराचा घणाघात
“जयंत पाटील राज्यातील बिनडोक नेते आहेत. जयंत पाटील पालकमंत्री होते, तेव्हा माझ्या भावाविरोधात हद्दपारीची नोटीस काढली. आमच्यावर अनेक गुन्हे दाखल केले, कार्यकर्त्यांना हद्दपार केलं. राज्यातील प्रत्येक नेता लोकांमध्ये असतो. एका नेत्याचा व्हिडीओ दाखवा, ज्यानं असं महिलेला बाजूला केलं आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वर्तवणुकीचं तुम्ही समर्थन करता,” अशी टीका जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
“जयंत पाटील यांच्या वक्तव्याला काडीचीही किंमत नाही. आम्ही राजकारण करत नाही, पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करतात. महिलेने तक्रार दिली आहे, त्याचा पोलीस तपास करतील. त्यामुळे विरोधकांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्याची गरज नाही,” असेही गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : “उद्धव ठाकरेंनी आपला पूर्ण पक्ष…”, भाजपाचं ठाकरे गटावर टीकास्र; राहुल गांधींच्या विधानाचा केला उल्लेख!
काँग्रेस नेते राहुल गांधींवरही गोपीचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला आहे. “राहुल गांधींच्या यात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही आहे. राहुल गांधी यांची यात्रा थांबवायला कोणाकडेही वेळ नाही. महाराष्ट्रात अनेक विषय आहेत. त्या विषयावर राज्य सरकार काम करत आहे. काँग्रेस जीवित करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत,” असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.