भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ असा उल्लेख करत टीका केली होती. यानंतर गोपीचंद पडळकरांवर अजित पवार गटाकडून समाचार घेण्यात आला होता. आता पुन्हा गोपीचंद पडळकर यांनी अप्रत्यपक्षणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. ते माळशिरसमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“महाराष्ट्रात कुठला लांडगा भांडण लावतो, हे सर्व लोकांना माहिती आहे. रिपाई पक्षांचे तुकडे कुठल्या लांडग्यानं केले? बी के यांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला? धनगरांना एसटीऐवजी एनटीचा दाखला कुठल्या लांडग्यानं दिला?” असे सवाल उपस्थित करत पडळकरांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
हेही वाचा : मीरा बोरवणकरांनी अजित पवारांबाबत केलेल्या ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवार म्हणाले…
“माझ्यावर दोनदा हल्ला झाला. सोलापुरात दगड माझ्या गाडीवर टाकण्यात आला. मी धनगर आणि भटक्या समाजासाठी काम करतोय. धनगर समाजाची जागर यात्रा काढल्यानं आम्ही स्पर्धेत येऊ शकतो, हे प्रस्थापितांना माहिती आहे. त्यामुळे हे थांबवायचं असेल, तर मला थांबवावं लागेल. पण, काहीही झाले, तरी धनगर आरक्षणाची चळबळ थांबू नये,” असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलं.
हेही वाचा : “मिंधे गटातील १३ पैकी १० खासदारांचं विसर्जन होणार, लोकसभेआधी…”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान
गोपीचंद पडळकर अजित पवारांबद्दल काय म्हणाले होते?
“धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही,” असं टीकास्र गोपीचंद पडळकरांनी अजित पवारांवर डागलं होतं.