शरद पवारांनी सरकारच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. पुणे, मुंबई, नाशिकमध्ये अनेक उद्योग शरद पवार यांनी आणले. शिक्षण क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, त्यांनी मोठं काम केलं आहे. पवारांमुळे आज महिलांना आरक्षण मिळालं आहे. म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलं होतं. यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीकास्त्र डागलं आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, “शरद पवार जाणते नाहीतर नेणता राजा आहेत. यावरती सर्व लोकांचा आक्षेप आहे. पण, राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील लोकांना चाटूगिरी करण्याची सवय लागली आहे. त्यामुळे ते ठासून बोलतात. तसेच, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात जोरात काम सुरु आहे. त्यामुळे शरद पवारांची फडणवीसांबरोबर तुलना होऊ शकत नाही. पवारांचा तीन-साडेतीन जिल्ह्यांतील पक्ष आहे. पवारांचं उभं आयुष्य गेलं, पण तीन अंकी आकडा पार करत आला नाही.”
हेही वाचा : “शरद पवार मोठे नेते, पण…”, ‘त्या’ विधानावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर
“फडणवीसांच्या नेतृत्वाखाली १२२ आमदार आले. तुम्ही त्यांची कुठं माप काढत बसता आहात. देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व दूरगामी आणि गावगाड्यापर्यंत पोहचलेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना फडणवीसांना सर्व बाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, फडणवीसांचा हेतू स्पष्ट आणि स्वच्छ आहे,” असं गोपीचंद पडळकरांनी सांगितलं.
हेही वाचा : “सल्ले द्यायचं असतील, तर…”, चित्रा वाघ यांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर; रुपाली चाकणकरांवरही टीकास्त्र!
“भाजपाच्या खासदार, आमदार, जिल्हापरिषद सदस्य, सरपंच, नगरसेवकांची संख्या पाहावी. राष्ट्रवादी ही गाजराची पुंगी आहे, ही वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. १९९९ पासून आतापर्यंत वाजली, आता ती मोडून खावीच लागणार आहे. कारण, कोणताही विचार नसलेला पक्ष टिकत नाही. सरदार जमा करुन टोळी तयार केली आहे. पक्षाला कोणताही वैचारिक आधार नाही. राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यानं विचारधारेवर ५ मिनीटांचं भाषण केलेलं दाखवावं. त्यामुळे राष्ट्रवादीसारख्या कुबड्याची भाजपाला गरज नाही,” असा हल्लाबोल गोपीचंद पडळकरांनी केला आहे.