भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सोलापूरमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीचं नुकसान झालं असून त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना इजा झाली नसल्याची माहिती स्वत: गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. मात्र, हे सांगताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मड्डेवस्तीत बैठक झाल्यानंतर गाडीत बसलो आणि काही अंतरावर गेल्यावर गाडीवर दगड फेकण्यात आले. त्यानंतर ते सगळे पळून गेले. राज्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की पवारांच्या नेतृत्वाखाली कशी गुंडगिरी चालते. कुणालातरी पुढे केलं असेल”, असं पडळकर म्हणाले आहेत. त्यामुळे यावरून पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
“पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये आहेत”
“राज्यात आम्ही लोकशाही मानतो, आम्ही सुसंस्कृत आहोत, आम्हाला लोकांची काळजी आहे अशा वावड्या उठवतात त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. माझा आवाज बंद करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, तर तो असा बंद होणार नाही. उद्या गोळ्या जरी घातल्या, तरी मी माघार घेणार नाही. हे सगळे पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये आहेत. त्यांचं सगळं उघडं पडतंय, बुरखा फाटतोय. मला रोज मोबाईलवर धमक्या देणारे, शिवीगाळ करणारे मेसेज येतात. गेल्या ५० वर्षांत त्यांनी अशीच दादागिरी राज्यात केली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू आता सरकली आहे”, असं गोपीचंद पडळकर यावेळी म्हणाले.
“रात गेली हिशोबात, अन…”
दरम्यान, आज दुपारीच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला होता. “मी लहान असल्यापासून शरद पवार गेल्या ३० वर्षांपासूनचे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना पुढच्या ३० वर्षांच्या भावी पंतप्रधानपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांचे राज्यात ३-४ खासदार आहेत. साडेतीन जिल्ह्यांच्या बाहेर त्यांचा पक्ष नाही. दिल्लीतलं राजकारण मला कळत नाही. पण कोंबड्याला वाटतं की मी ओरडल्याशिवाय उजाडतच नाही. असे काही कोंबडे दिल्लीत एकत्र आले होते. त्यांनी बैठका घेतल्या. यांचं असं झालं आहे की रात गेली हिशोबात आणि पोरगं नाही नशिबात. त्यामुळे त्यांनी असाच दबा धरून बसावं. पुढच्या लवणात कधीतरी त्यांना ससा सापडेल”, असं पडळकर म्हणाले होते.
तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत.@PawarSpeaks@BJP4Maharashtra pic.twitter.com/M6fUo8xVQb
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 30, 2021
संस्काराच्या टीकेवरही प्रत्युत्तर
गोपीचंद पडळकर यांनी बाळासाहेब थोरात यांची मुलगी शरयू देशमुख यांना देखील संस्कारांच्या मुद्द्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्रात दीडशे घराणी अशी आहेत जी फार सुसंस्कृत आहेत. त्यांचा अतिसंस्कृतपणा महाराष्ट्राला गेल्या ७० वर्षांत लुटतोय. या सगळ्यांचे आजोबा, यांचे वडील, हे सगळे सुसंस्कृत. आणि आम्ही काही बोलायला गेलं की आम्ही असंस्कृत. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. मला काय बोलावं, काय नाही बोलावं हे कळतं. मला कुणी शिकवायची गरज नाही. मी ज्या संस्कारांतून आलोय, तो संस्कार पुढे नेईन. तुमचं जे उघडं करायचंय, ते उघडं करणारच. तुम्हाला उघडं केलं, की असंस्कृत. राज्यात सुरू असलेलं थोतांड बंद करण्यासाठीच आम्हाला बोलावं लागतंय”, असं पडळकर म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात सुसंस्कृत घराण्यांनी गेल्या सत्तर वर्षात काय वाट लावलीये ते आम्ही पाहतोयच.. त्यांनी आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवण्याची गरज नाही.. त्यांचं पितळ ऊघड पडतंय म्हणून ते ‘सुसंस्कृत’पणाचा आव आणतायेत..#MaharashtraCongress@bb_thorat@BJP4Maharashtra pic.twitter.com/MqDlcTaOVh
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 30, 2021
नेमकं पडळकर आणि थोरातांमध्ये काय झालं? वाचा सविस्तर
राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर पडळकरांनी “काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा प्यायल्यासारखे बरळू लागले आहेत”, अशी टीका केल्यानंतर त्यावर शरयू देशमुख यांनी “पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होतं. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होते. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!” अशी टीका पडळकरांवर केली होती.