भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. श्रीलंकेतील राष्ट्रध्यक्षाप्रमाणे शरद पवार यांना पळून जावं लागेल. लोकांनी खूप सहन केलं आहे. ते राष्ट्राध्यक्ष पळून गेले, तुम्ही तर साधे खासदार आहात, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीनिमित्त भाजपाच्या ‘मिशन बारामती’ला आजपासून ( ६ सप्टेंबर ) सुरूवात झाली. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या मेळाव्याला गोपीचंद पडळकर यांनी संबोधित केलं. यावेळी भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते.

“तुमच्या घराण्याने खूप सेवा केली…”

“केंद्राने लोकसभा प्रवास योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची नियुक्ती केली. त्या बिनटाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. एकदा त्या बारामतीला आल्या तर पवारांना कळणार सुद्धा नाही आहे, भाजपाचा खासदार कसा दिल्लीला गेला. जेव्हापासून सीतारमण यांचा दौरा निश्चित झाला, तेव्हापासून सुप्रिया सुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. तुमच्या घराण्याने ५० वर्षे खूप सेवा केली. आता आराम करा,” असा टोला पडळकर यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.

“अजित पवारांच्या मागे २ आमदार सुद्धा…”

“बारामतीत परिवर्तन करायची वेळ आली आहे. बारामती हा बालेकिल्ला नसून, शरद पवारांची एक टेकडी आहे. दोन वर्ष मी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण पोलीस, प्रांत, तहसिलदार यांच्यावर चालते. माझ्यावर केसेस दाखल केल्या. समाजकारण, राजकारणात काम करताना केसेस दाखल होतात. केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा. अजित पवारांनी बंड केलं, तेव्हा २ आमदार सुद्धा आमदार मागे राहिले नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या मागे ५० आमदार राहिले,” असा टोमणा अजित पवारांना पडळकर यांनी मारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla gopichand padalkar criticized ncp leader sharad pawar in baramati ssa