सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजासाठीचंच राजकीय आरक्षण रद्द ठरवल्यानंतर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत सदस्यपदाच्या एकूण २०० जागांसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. मात्र, यावरून विरोधकांनी तीव्र आक्षेप घेत राज्य सरकारवर टीका करायला सुरुवात केली आहे. राज्यात भाजपा सर्व २०० जागांवर ओबीसी उमेदवार देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर आता भाजपा आमदार गोपीचंद पडळर यांनी राज्य सरकारवर आणि विशेषत: सरकारमधील ओबीसी नेते आणि मंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं आहे. “सरकारमधील ओबीसी नेते मंत्री पवार काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झाले आहेत”, अशा शब्दांत गोपीचंद पडळकरांनी निशाणा साधला आहे.
पुढील महिन्यात होणार निवडणूक
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषद सदस्यपदाच्या १३० आणि पंचायत सदस्यपदाच्या ७० अशा एकूण २०० जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली. पुढील महिन्यात १९ जुलै रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार असून २० जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे या सर्व जागा खुल्या वर्गासाठी ठेवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाने राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.
आपण अधिवेशनही दोन दिवसांचं ठेवलं असताना निवडणुका कशा घेऊ शकतो – छगन भुजबळ
ओबीसी मंत्र्यांच्या शब्दाला काडीची किंमत नाही
“महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेते हे पवार काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत आणि ओबीसी मंत्र्यांचं माकड झालं आहे. या ओबीसी मंत्र्यांच्या शब्दाला कवडीचीही किंमत राहिलेली नाही.. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाहीत अशी भीमगर्जना ओबीसी मंत्र्यांनी केली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणुका जाहीर झाल्या. यांच्या शब्दाला मातीमोल किंमत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे”, अशा शब्दांत गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
“..मग आमचे उमेदवार हरले तरी पर्वा नाही”, जि.प. पोटनिवडणुकांवरून फडणवीसांचा सरकारला इशारा!
फडणवीसांनी दिला सरकारला इशारा
याआधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सरकारला इशारा दिला आहे. येत्या २६ जून रोजी भाजपाकडून या मुद्द्यावर तीव्र आंदोलन केलं जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. “या निवडणुकांच्या विरोधात आम्ही आंदोलन तर करणारच आहोत. पण तरीही या सरकारचा जर निवडणुका लढवण्याचा डावच असेल, तर भाजपा या सगळ्या जागांवर फक्त ओबीसी उमेदवार लढवेल. जिंकलो, हरलो तरी आम्हाला पर्वा नाही. आम्ही त्या जागा ओबीसींसाठी आरक्षित आहेत असं समजून ओबीसी उमेदवार लढवू. जोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजपा शांत बसणार नाही”, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.