भाजपा नेते गोपीचंद पडळकर अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळेंवर टीका करत असतात. अलीकडेच त्यांनी अजित पवारांचा उल्लेख ‘लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू’ तर सुप्रिया सुळेंचा उल्लेख ‘लबाड लांडग्याची लेक’ असा केला होता. गोपीचंद पडळकरांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. यानंतर आता गोपीचंद पडळकरांनी कुणाचंही नाव न घेता, साहेब, दादा आणि ताईसाहेब हे सगळं फेकून द्या, असं सूचक विधान केलं आहे. ते वर्धा येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, “आपण गुलामगिरीत आहोत. इंग्रजांनी या देशात जशी गुलामगिरी राबवली, तशा पद्धतीने प्रस्थापितांनीही गुलामगिरी राबवली. गुलामगिरीची काही प्रतिकं आहेत. साहेब, दादा, ताई, ताईसाहेब ही सगळी गुलामगिरीची प्रतिकं आहेत. यांना साहेब वगैरे म्हणत बसू नका. तरच तुमची प्रगती होईल. हे साहेब, दादा किंवा ताईसाहेब हे सगळं बाजुला फेकून द्या. हे आपल्याला नियंत्रणात, गुलामगिरीत ठेवतात.”

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंनी कुणाबरोबर जावं, हा त्यांचा अधिकार”, शिंदे गटाच्या मंत्र्याचं सूचक विधान

“प्रस्थापितांचा पोरगा एका दिवसात मतदारसंघाचा भाग्यविधाता होतो. पण गोरगरीब भटक्या, विमुक्तांचा ओबीसींचा मुलगा दहा-दहा वर्षे राबला तरी त्याला नेता होता येत नाही. ही काय व्यवस्था आहे, ही काय भानगड आहे? यावर आपण का विचार करत नाही,” असंही पडळकर म्हणाले.

हेही वाचा- “अजित पवार लबाड लांडग्याचं…”; ‘त्या’ नोटीसवर पडळकरांची प्रतिक्रिया, म्हणाले, “मी माफी…”

“मी काही बोलायला लागलो की,गोपीचंद काहीही बोलतो, असं म्हणतात. पण मी काहीही बोलतो म्हणजे शिव्या देतो का? मी मुद्यावरच बोलतो. मी जे मुद्दे मांडतो, त्यावर त्यांनी (विरोधकांनी) बोलावं”, असंही पडळकरांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla gopichand padalkar statement saheb dada and taisaheb these are symbol of slavery rmm