भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादी असल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकर करत असताना त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना खोचक टीका केली होती. “घरात जसं शेंबड्या पोराला मोठी माणसं आवरतात, तसं भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना आवरायला हवं”, असं रोहित पवार म्हणाले होते. यावर आता गोपीचंद पडळकर यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ शी बोलताना पडळकरांनी रोहित पवारांवर टीका करतानाच शरद पवारांवर देखील निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते रोहित पवार?

“गोपीचंद पडळकरांचं कर्तृत्व काय हे सांगलीतल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्यावरच्या केसेस बघितल्या तर दिसेल. त्यांचे ठराविक कार्यकर्ते सोडले, तर त्यांच्या आरोपांना कुणीही महत्त्व देत नाहीत. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीही आहे. त्यामुळे मोठ्या लोकांनी या लोकांना आवरलं पाहिजे”, असं रोहित पवार म्हणाले होते.

“तुम्ही अहिल्यादेवींपेक्षा मोठे झालात का?”

यावरून आता पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “राज्यात नेमकं मोठं कोण? रोहित पवारांना हा प्रश्न विचारला पाहिजे. तुमच्या घरातल्या कुणालाच मी मोठं मानत नाही. आधी आजोबा आणि नातवानं हे ठरवलं पाहिजे. आमच्या महापुरुषांचा इतिहास तुम्ही पुसायला निघाले आहात. त्याचं उत्तर तुम्ही राज्यातल्या जनतेला दिलं पाहिजे. आजोबांनी जेजुरीत भाषणात काय म्हटलं? जिथे रोहित पवार नेतृत्व करत आहेत, तिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला. म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे झाले का?” असा सवाल पडळकरांनी केला आहे.

“मी तुम्हाला आवरायचं काम करतोय”

“चौंडीचा कार्यक्रम तुम्ही घ्यायची गरजच नव्हती. तिथे तुम्ही उघडे पडलात. त्या कार्यक्रमात शरद पवार म्हणतायत की अहिल्यादेवींच्या पावलावर पाऊल ठेऊन रोहित पवार काम करतोय. रोहितला अजून शेंबुड काढायचा कळतो का? तुम्ही अहिल्यादेवींसोबत तुलना करायला चालले आहात. त्यामुळे मला आवरायचं सोडा. गेल्या ७० वर्षांत तुम्हाला आवरायला कुणी नव्हतं. तुम्हाला आवरायचं काम मी करतोय. तुम्ही आता पूर्णपणे उघडे पडले आहात”, अशा शब्दांत पडळकरांनी टीका केली आहे.

“गोपीचंद पडळकरांचं कर्तृत्व काय हे सांगलीतल्या पोलीस…”, आमदार रोहित पवारांचा खोचक टोला!

“रोहित पवारांची अजून लायकी नाहीये. आजोबांनी त्यांना सादर करायचं, अहिल्यादेवींचा कार्यक्रम हायजॅक करायचा इतक्या लेव्हलचे, लायकीचे तुम्ही नाही. आता हे लोकांना कळालं आहे. चौंडीतला कार्यक्रम आटोपता का घ्यावा लागला? रोहित पवारांनी कार्यक्रम घ्यायचा काही संबंध नाही. तुमच्या आजोबांना ८२ वर्ष झाली, तुम्हाला कधी अहिल्यादेवींची जयंती दिसली नाही. तुम्ही कार्यक्रम घेताय, मग आम्ही काय मेलोय का?” असा सवाल देखील पडळकरांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla gopichand padalkar targets ncp mla rohit pawar sharad pmw