राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा जोरदार कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. कधी हे आरोप ‘५० खोक्यां’चे असतात तर कधी ठाकरे सरकारच्या काळात घोटाळे झाले असा दावा करणारे! यादरम्यान सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लक्ष्य केलं असून त्यांच्या पक्षानं शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न चालवल्याचाही आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला. आता भाजपाकडून शरद पवारांना लक्ष्य करण्यात आलं असून “त्यांच्यासोबत जे गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला”, असा खोचक टोला भाजपाकडून लगावण्यात आला आहे.
“बाळासाहेबांनी कधीच..”
भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी सोमवारी कराडमधील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांवर खोचक शब्दांत टीका केली. “राज्यात भाजपा आणि शिवसेनेची सत्ता आली. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार केलं नसतं. सरकारच्या बाहेर बसणं पसंत केलं असतं. तुम्ही शरद पवारांसोबत सरकार केलं”, असं जयकुमार गोरे म्हणाले.
“शरद पवारांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे”
दरम्यान, शरद पवारांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे अशा शब्दांत जयकुमार गोरेंनी टोला लगावला. “शरद पवारांनी आजपर्यंत एकही गोष्ट विश्वासानं केलेली नाही. शरद पवार कधीही कुणासोबत विश्वासानं वागले नाहीत. त्यांच्यासोबत जे कुणी गेले, त्यांचा ओक्के कार्यक्रम झाला. काँग्रेस त्यांच्यासोबत गेली, काँग्रेसची काय अवस्था झाली तुम्ही बघत आहात. काँग्रेस कमी होती म्हणून की काय उद्धव ठाकरे गेले. पण उद्धव ठाकरे तर मोकळेच झाले”, असं गोरे यावेळी म्हणाले.
“शरद पवारांसोबत संजय राऊत गेले. आता कुठे आहेत ते? नवाब मलिक कुठे आहेत आज? अनिल देशमुख कुठे आहेत आज? जो राज्याचा गृहमंत्री सगळं पोलीस खातं चालवत होता, तो कधी आत गेला त्यालाही कळलं नाही”, असा टोलाही त्यांनी लगावला.
“सत्ता आली तर उतू नका, मातू नका. आपल्याला जेव्हा संधी मिळते तेव्हा तिचं सोनं करा आणि लोकांची मनापासून सेवा करा”, असा सल्लाही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला.