भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तोच अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट बरोबर घेत भाजपाशी हातमिळवणी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी या सरकारमधील मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आलं. यावेळी अनेक आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी करून घेतल्याने शिंदे गटातील आमदारांसह भाजपामध्येही नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. तसेच पूर्ण बहुमतातलं सरकार असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्तेत सहभागी करून का घेतलं? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात भारतीय जनता पार्टीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे आणि जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीवेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी म्हटलं की, राज्यातल्या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत. आपल्या नेतृत्वाला माहिती आहे की, कोणाला बरोबर घ्यायचं आणि कधी सोडायचं?

हे ही वाचा >> “काहीही झालं तरी राष्ट्रवादीचा पालकमंत्री होऊ देणार नाही”, शिंदे गटातील नेत्याचा थेट विरोध

जयकुमार गोरे म्हणाले, “आपल्या भारतीय जनता पार्टीने घेतलेला निर्णय खूप विचार करून घेतलेला आहे. आपलं नेतृत्व खूप सक्षम आणि खूप विचारी आहे. त्या नेतृत्वाला माहिती आहे, कोणाला आपल्याबरोबर घ्यायचं, कोणाला सोडायचं, कोणाला किती दिवस आपल्याबरोबर ठेवायचं आणि कोणाला कधी सोडायचं? हे सगळं आपल्या नेतृत्वाला माहिती आहे. तसेच या सरकारचे हायकमांड हे देवेंद्र फडणवीसच आहेत.” आमदार गोरे हे वक्तव्य करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर निशाणा साधत होते का? यावर आता चर्चा सुरू आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla jaykumar gore says party know how long to keep someone with us asc