राजकीय नेतेमंडळींच्या सभा किंवा भाषणं हा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि त्यांच्या मतदारसंघांसाठी औत्सुक्याचा विषय असतो. या भाषणांमधून अनेकता काही योजना, घोषणा, सुधारणांचा कार्यक्रम दिला जातो. त्यातून जनतेला काही प्रमाणात दिलासा किंवा आधार देण्याचाही प्रयत्न केला जातो. पण भाजपाचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी आपल्या भाषणात थेट माणसं कापण्याची भाषा केल्यामुळे त्यांचं हे विधान चर्चेत आलं आहे. आपल्या विधानाचे पडसाद उमटल्याचं लक्षात येताच विधानाचा विपर्यास करण्यात आल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. टीव्ही ९ नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
काय म्हणाले किसन कथोरे?
आमदार किसन कथोरे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान वरील उल्लेख केला. त्यांच्या या भाषणाच्या व्हिडीओमधील माणसं कापण्यासंदर्भातलं त्यांचं विधान चर्चेत आलं आहे. “तुम्ही काय सांगता? मी जिथे घडलोय ना… आमच्याइथले काही लोक आलेत त्यातले. तुम्ही कोंबडा कापायचा म्हटला तरी तीन वेळा विचार करता, कापू का? आमच्याकडे एकदा कापू बोलला ना, की कापलाच. कोंबडा नाही, माणूस”, असं किसन कथोरे भाषणात म्हणाले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री आणि आमदाराच्या वादाने भाजप हैराण
दरम्यान, त्यांचं हे विधान चर्चेचा विषय ठरल्यानंतर कथोरे यांनी त्यापासून घुमजाव केलं आहे. टीव्ही ९ नं दिलेल्या वृत्तानुसार आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची भूमिका आता किसन कथोरे यांनी घेतली आहे.
कोण आहेत किसन कथोरे?
किसन कथोरे २०१९मध्ये चौथ्यांदा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले आहेत. २००४ व २००९ मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढले व जिंकले होते. २०१४ साली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी भाजपाकडून लढली व जिंकलीही.