विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकीकडे विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होत असताना दुसरीकडे विधानसभेत भाजपाच्या एका महिला आमदारांचा व्हडिओ चर्चेत आला. दुपारी एकच्या सुमारास सभागृहात चर्चा चालू असताना भाजपाच्या जिंतूरमधील आमदार फाईलमध्ये पैसे ठेवून ती पाठवताना दिसल्या. हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं. काहींनी तर मेघना बोर्डीकर यांच्यावर थेट भ्रष्टाचाराचे आरोपही केले. अखेर तीन तासांनी स्वत: मेघना बोर्डीकर यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय घडलं?
विधानसभेत शेवटच्या दिवशी दुपारी एकच्या सुमारास सत्ताधारी बाकावरील एक आमदार त्यांचा मुद्दा उभं राहून मांडत होते. त्यांच्यामागे तिसऱ्या बाकावर मेघना बोर्डीकर बसल्या होत्या. टेबलवर काम करताना त्यांनी एका फाईलमधील कागदावर काहीतरी लिहून ती फाईल विधानसभेतील कर्मचाऱ्याकडे दिली. व्हिडीओमध्ये हा एवढाच भाग दिसत असून त्यावरून मेघना बोर्डीकर यांना ट्रोल करायला सुरुवात झाली.
मेघना बोर्डीकर यांनी नेमके हे पैसे कुणाला दिले? कशासाठी दिले? कामकाज चालू असताना आणि त्यांच्यासमोरचेच आमदार बोलत असताना त्यांनी उघडपणे पैसे काढून फाईलमध्ये कसे ठेवले? यामागे नेमकं काय कारण आहे? असे अनेक प्रश्न व्हिडीओवरून उपस्थित करण्यात आले. अखेर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द मेघना बोर्डीकर यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. आपली तब्येत बरी नसल्यामुळे औषधं आणण्यासाठी पैसे दिल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
Maharashtra Live Updates: संजय राऊत चंद्रकांत पाटलांना विधानभवनात पाहताच म्हणाले, “अरे व्वा, आपण तर एकत्र यायलाच पाहिजे”; पाटलांनीही दिलं मिश्किल उत्तर!
काय आहे मेघना बोर्डीकर यांच्या पोस्टमध्ये?
मेघना बोर्डीकर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आपण एक हजार रुपये फाईलमध्ये ठेवून दिल्याचं सांगितलं आहे. “सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधे आणण्यासाठी एक हजार रुपये माझ्या स्वीय सहायकाकडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या स्वीय सहायकाकडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“असं असताना नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे”, अशा शब्दांत मेघना बोर्डीकर यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.