उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि काही अपक्षांच्या जोरावर उद्धव ठाकरे सरकारच्या पारड्यात १६९ आमदारांनी आपलं मत टाकलं. भाजपाने यावेळी सभात्याग केला तर एकूण ४ आमदार तटस्थ राहिले. हंगामी अध्यक्ष बदलल्यामुळे आणि नियमबाह्य अधिवेशन बोलवल्यामुळे भाजपा आमदारांनी पहिले सभागृहात आणि नंतर सभागृहाबाहेर घोषणाबाजी केली. यानंतर आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन महाविकास आघाडीवर बोचरी टीका केली आहे.
नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर, एका गाडीला माकडांनी वेढा घातल्याचा फोटो टाकला आहे. या फोटोत काही माकडं गाडीचा दरवाजा उघडून चालकाच्या जागी, काही गाडीच्या वर बसलेली दिसतात. याचसोबत या फोटोवर, लेकिन एक को भी चलाना नही आता ! अशी कॅप्शन लिहीलेली आहे.
— nitesh rane (@NiteshNRane) November 30, 2019
विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर, मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपात पेच निर्माण झाल्यामुळे निर्धारित वेळेत सरकार स्थापन होऊ शकलं नाही. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबतीने महाविकास आघाडी स्थापन करत सरकार स्थापन केलं. मात्र २ भिन्न विचारधारा असलेल्या पक्षाचं सरकार फारकाळ चालू शकणार नाही असा दावा विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने केला होता. त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सरकार कसं चालवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.