विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जशी सत्ताधारी आणि विरोधकांमधल्या आरोप-प्रत्यारोपांची चर्चा आहे, तशीच ती दोन्ही बाजूंनी होत असलेल्या नकलांवर देखील होऊ लागली आहे. विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर मोठा वाद उभा राहिला होता. त्यावर भास्कर जाधव यांना माफी देखील मागावी लागली होती. त्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या बाहेर पायऱ्यांवर निदर्शनं करताना ‘म्याव म्याव’ असा आवाज काढत सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावरून वाद सुरू असतानाच आता नितेश राणे यांनीच ट्वीट करून यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
“यांची ठाकरी भाषा आणि आम्हाला संस्कृतीचे धडे”
नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. “यांनी नक्कल केली, तर ती ठाकरी भाषा…आम्ही केली तर संस्कृतीचे धडे देणार…गेले ते दिवस..नियम सगळ्यांना एकच.. लक्षात असू द्या. नाहीतर परत म्याव म्याव आहेच!” असं नितेश राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांनीही टोचले कान
दरम्यान, नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पाहून म्याव म्याव आवाज काढल्याचा दावा केला जात असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांचे कान टोचले आहेत. “कुठल्या पक्षाच्या आमदारांनी कुठल्याही पक्षाच्या नेत्यांची नक्कल करणं, त्यांची मानहानी होईल असं वक्तव्य करणं योग्य नाही. हे सगळ्यांनीच पाळलं पाहिजे. हा मुद्दा सगळ्यांनी योग्य त्या स्पिरिटीमध्ये घेतला पाहिजे. महाराष्ट्रानं नेहमीच एक पातळी पाळली आहे. तिला सोडून असं वर्तन होऊ नये हे या सभागृहातल्या सगळ्याच लोकांनी पथ्य पाळलं पाहिजे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.