दोनच दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. भवनासमोर आंदोलन करणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांना शिवसेना कार्यकर्ते भिडले आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. तशाच स्टाईलचा राडा आज कोकणात सिंधुदुर्गमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत यांना खोचक टोला लगावला आहे. “शिवप्रसाद काय अतो, हे संजय राऊतांनी वैभव नाईकांना विचारावं, पोटभर दिलाय आज”, असं नितेश राणे म्हणाले आहेत. शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्यावर संजय राऊतांनी केलेल्या शिवप्रसाद आणि शिवभोजन थाळीचा संदर्भ घेऊन केलेल्या विधानावर नितेश राणेंनी हा टोला लगावला आहे.
पाहिजे असेल तर पार्सल घेऊन येतो!
भाजपा आमदार नितेश राणे यांनी या मुद्द्यावरून संजय राऊत यांची खिल्ली उडवली आहे. “शिवप्रसाद काय असतो, ते संजय राऊतांनी आमदार वैभव नाईकांना विचारावं. पोटभर दिलाय आज आमच्या कार्यकर्त्यांनी. पाहिजे असेल, तर पार्सल घेऊन येतो सामना ऑफिसमध्ये. टेस्ट आवडेल नक्की!” असं ट्वीट करत नितेश राणेंनी संजय राऊतांना देखील या ट्वीटमध्ये टॅग केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राणे बंधूंकडून सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केलं जात असताना त्यामध्ये नितेश राणेंच्या या नव्या ट्वीटची भर पडली आहे.
काय झालं सिंधुदुर्गमध्ये?
सिंधुदुर्गमध्ये आज एका पेट्रोलपंपावर शिवसेना आणि राणेसमर्थक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी एका पेट्रोल पंपावर मोफत पेट्रोल वाटायला सुरुवात केली. भाजपाला पेट्रोल दरवाढीवरून खिजवण्यासाठी हा प्रकार केल्याचं बोललं जात होतं. हा प्रकार लक्षात आल्यानंतर राणेसमर्थक भाजपा कार्यकर्ते तिथे पोहोचले. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. यावेळी आमदार वैभव नाईक देखील त्यामध्ये पडले होते, पण तेवढ्यात पोलिसांनी मध्ये पडत हा प्रकार थांबवला.
“होय, शिवसेना गुंडगिरी करते, आम्ही सर्टिफाईड गुंड”, संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं!
भवनावरच्या राड्यावरून राऊतांनी दिला होता इशारा!
शिवसेनेने राममंदिराजवळील अयोध्येतील कथित जमीन घोटाळ्याविषयी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर आंदोलन केलं होतं. त्यावेळी हा राडा झाला. त्यानंतर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी भाजपाला अप्रत्यक्षपणे इशाराच दिला होता. “शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणामध्येच नाही. एक टोळका आला होता. आता तो कशासाठी आला होता आणि त्यांचा संबंध काय हे समजून घेतलं पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहे. राजकीय मतभेद असू शकतात. पण ती बाळासाहेब ठाकरेंची वास्तू आहे. मराठी अस्मितेचं प्रतिक असणारी वास्तू आहे. त्याच्यावर चाल केली तर शिवसैनिक आणि मराठी माणूस शांत बसेल का?” असा सवाल करतानाच, “शिवप्रसाद दिला आहे, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका“, असा अप्रत्यक्ष इशाराही राऊतांनी दिला होता. त्याचा संदर्भ घेऊन आज सिंधुदुर्गात झालेल्या राड्यासंदर्भात नितेश राणेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.