शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर न्यायालयाबाहेरच राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये मोठा वाद झाला. जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे न्यायालयाबाहेर येऊन आपल्या गाडीमध्ये बसले. पण यावेळी कोर्टातील कामकाज पूर्ण झालं नसल्याने पोलिसांनी नितेश राणे यांची गाडी अडवली होती. यावरुन त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे चांगलेच संतापले आणि पोलिसांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी नितेश राणे गाडीतच बसलेले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

PHOTOS: कोर्टाबाहेर राणे विरुद्ध पोलीस वाद; निलेश राणेंनी पोलिसांना विचारला जाब; नेमकं काय झालं होतं?

दरम्यान निलेश राणे पोलिसांसोबत हुज्जत घालत होते तेव्हा गाडीत बसलेले नितेश राणे मात्र त्यांना शांत राहण्याची विनंती करत होते. “अरे नको ना निलेश, वकिलांना बोलू दे ना”, असं नितेश राणे निलेश राणेंना सांगत होते.

नेमकं काय झालं होतं ?

कोर्टाने नितेश राणेंना जामीन अर्ज नाकारल्यानंतर ते कोर्टातून निघत असताना पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. यावेळी त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे गाडीतून खाली उतरले आणि पोलिसांना गाडी का थांबवली असा जाब विचारला. यावेळी त्यांचे समर्थकही आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सुप्रीम कोर्टाच्या आदेशापेक्षा काय महत्वाचं आहे ते सांगा अशी विचारणा यावेळी त्यांनी केली. कोणत्या अधिकाराखाली गाडी अडवली जात आहे अशी विचारणा त्यांनी केली. सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले असतानाही आमच्या पुढे मागे पोलिसांचा पहारा का ठेवला जात आहे? असं विचारत त्यांनी संताप व्यक्त केला.

पोलीस गाडीसमोर उभे राहिले आणि फोनवर वरिष्ठांशी बोलत असल्याचं सांगू लागले. मात्र बराच वेळ हा प्रकार सुरु असल्याने निलेश राणे संतापले आणि पोलिसांसोबत वाद घालू लागले. “कुठल्या अधिकाराखाली गाडी थांबवलीय सांगा,” असं म्हणत निलेश राणेंनी पोलिसांना सवाल केला.

पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

दुसरीकडे पोलिसांनी वरिष्ठांशी आम्ही चर्चा करत असून अद्याप न्यायायलयाचा निकाल आला नाही असं सांगू लागले. त्यानंतर निलेश राणेंनी निकाल खुल्या न्यायालयात लागला असून तुम्ही अशाप्रकारे एखाद्या आमदाराला थांबवू शकत नाही असं म्हणत रस्ता मोकळा करण्यास सांगितलं. मात्र तरीही पोलीस गाडी समोरुन न हटल्याने, “कशासाठी आम्ही थांबायचं ते सांगा, कोर्टाचा अपमान आम्ही करतोय की तुम्ही,” असा प्रश्न पोलिसांना विचारला.

Nitesh Rane Case Hearing: नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, जामीन अर्ज फेटाळला; कोर्टाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा

यावर पोलिसांनी सहकार्य करा असं सांगताच निलेश राणे, “१० मिनिटांपासून उभाय मी, मी सहकार्य करतोय. कुठल्या अधिकाराखाली तुम्ही आमदाराला गाडीत बसवलंय ते सांगा,” असा प्रश्न चढ्या आवाजात विचारला.

…म्हणून नितेश राणेंची गाडी थांबवण्यात आली होती –

आता ऑर्डर झाली म्हणून संपलं असं त्यांना वाटलं होतं. आम्ही अर्ज केला आहे त्यावर तुम्हाला म्हणणं मांडायचं आहे. त्यामुळे परत चला हे सांगण्यासाठी नितेश राणेंना थांबवण्यात आलं होतं. त्यांचे वकील पुन्हा कोर्टात आले होते. सर्वांना थांबणं भाग होतं त्यामुळे नितेश राणेंना थांबवलं असं प्रदीप घरत यांनी सांगितलं आहे.

निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla nitesh rane requesting brother nilesh rane to not fight with police outside court in kankavli sgy