छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर शिंदे गट आणि भाजपाने निषेध व्यक्त केला. अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी शिंदे गट, भाजपाकडून करण्यात आली. मात्र अजित पवार आपल्या मतावर ठाम आहेत. असे असतानाच आता भाजपाचे नेते नितेश राणे यांनी गाड्यांवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नाव लिहिलेले स्टिकर लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रातील सर्व गाड्यांवर आता हे स्टिकर्स दिसतील, असे राणे यांनी सांगितले आहे. ते कणकवली येथे ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >> एअर इंडियाच्या विमानात लघुशंका करणाऱ्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं जातंय? वडिलांनी केला खळबळजनक दावा!
“मागील अनेक पिढ्यांपासून आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीरच म्हणतो. आमच्या अगोदरच्या पिढीनेही त्यांना धर्मवीरच म्हटलेलं आहे. येणाऱ्या पिढीसाठीही संभाजी महाराज यांची धर्मवीर अशीच ओळख असेल. आता कोणीतरी उठतं. आपली सिरियल चालावी म्हणून ते नवनवीन गोष्टी आणतात. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते,” अशी भूमिका नितेश राणे यांनी मांडली.
हेही वाचा >> Delhi Accident : कंझावाला अपघात प्रकरणातील सातव्या आरोपीचे आत्मसमर्पण; दिल्ली पोलिसांची माहिती
“छत्रपती संभाजी महाराजांना हिंदू धर्मापासून दूर करायचं आहे. हिंदू आणि संभाजी महाराज हे एकत्र येता कामा नयेत, यासाठी प्रयत्न केला जातोय. हे षडयंत्र आम्ही हाणून पाडणार आहोत. आम्ही याला बळी पडणार नाहीत. आमच्या राजांची बदनामी का केली जात आहे. संभाजी महाराज यांनी जे बलिदान दिले, त्याचा अपमान कशाला? संभाजी महाराज यांनी औरंग्यासमोर न झुकता हाल सहन केले. टीका करणाऱ्यांनी या प्रसंगाला एक तासासाठी सामोरे जावे. छत्रपती संभाजी महाराज यांनी ते ४० दिवस सहन केलेले आहे. तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांची उंची गाठता येत नसेल तर टीका कशाला करायची,” अशी टीका नितेश राणे यांनी केली.
हेही वाचा >> “त्याने माझ्या डोक्यात बाटली फोडली हे…” सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा खुलासा
“छत्रपती संभाजी महाराजांची उभ्या महाराष्ट्रात धर्मवीर म्हणूनच ओळख आहे. म्हणूनच आम्ही कणकवली, सिंधुदुर्गापासून ही मोहीम सुरू केली आहे. आता पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गाडीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर दिसेल,” असेही नितेश राणे यांनी सांगितले.