काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपाने शिवसेनेला ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपाच्या या टीकेला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधींच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. नितांत आदर आहे. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. अशा मातृसंस्थांच्या पिल्लांनी आम्हाला प्रश्न विचारावा हे दुर्देव आहे. निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. तेव्हा आरएसएस कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील अत्याचार किती थांबवले? पीडीपीबरोबर युती केलेल्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला. याला आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आहेत. त्यांनी सतत काँग्रेसबरोबर जात सोनिया गांधी आणि राहुल गांधींचे पाय पकडण्याचं काम केलं. सावरकरांना शिव्या देणाऱ्या राहुल गांधींबरोबर आदित्य ठाकरे चालत होते. भाजपाचे हिंदुत्व जगाला माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासण्याची गरज आहे,” असा घणाघात प्रसाद लाड यांनी केला आहे.