राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाकडून सरकार पडण्याबाबत विधानं केली जात होती. आता भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या राज्यातील १८ खासदारांपैकी १३ ते १४ खासदार भाजपाच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यासंदर्भात प्रसाद लाड यांनी शिवसेना खासदारांनी पक्षाकडे नाराजी व्यक्त केली असल्याचं सांगत त्या आधारावर २०२४मध्ये हे खासदार हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या पक्षासोबत जोडले जातील, असा दावा केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे हे नेमके कोणते खासदार आहेत, यावरून चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना खासदारांची संजय राऊतांकडे तक्रार?
दिल्लीमध्ये शिवसेना खासदार संजय राऊतांनी शिवसेनेच्या इतर खासदारांची बैठक घेतल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीमध्ये शिवसेना खासदारांनी संजय राऊतांकडे तक्रारींचा पाढा वाचल्याचं देखील बोललं जात आहे. या चर्चांमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं असून नेमक्या काय राजकीय घडामोडी सुरू आहेत, याविषयी अंदाज लावले जात आहेत. त्यातच आता शिवसेना खासदार भाजपासोबत जोडले जातील, या प्रसाद लाड यांच्या विधानामुळे चर्चेनं अधिकच जोर धरला आहे.
“खासदारांनी तळमळ बोलून दाखवली”
“त्यांच्या मनातली तळमळ, मळमळ त्यांनी बोलून दाखवली आहे. माझ्या मते शिवसेना खासदारांना सन्मान मिळत नाही. निधी मिळत नाही. पालकमंत्र्यांकडून त्यांना विचारलं जात नाही ही त्यांच्या मनातली खदखद आहे. शिवसैनिक खासदार झालेत ते मोदींच्या नावाने निवडून आले आहेत. पण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका बदलली आहे. विकासाचा मुद्दा सोडला आहे”, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.
“कुणी कितीही प्रयत्न केला, तरी माझं नाव…”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला!
“किती खासदार भाजपासोबत जोडले जातील हे महत्त्वाचं”
“शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचे मुद्दे आता सोडले आहेत. त्याची नाराजी अजूनही खासदारांच्या मनात आहे. ही नाराजी २०२४म्ध्ये ते व्यक्त करतील. शेवटी हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या पक्षासोबत ते जोडले जातील, याची मला खात्री आहे. १३ ते १४ खासदारांनी स्वत:हून त्यांची नाराजी त्यांच्या नेत्यांसमोर ठेवली आहे”, असं प्रसाद लाड म्हणाले. “किती खासदार आमच्यासोबत आहेत, यापेक्षा किती खासदार भाजपासोबत जोडले जातील, हे महत्त्वाचं आहे”, असं देखील ते म्हणाले.