शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी बुलढाणा दौऱ्यावर गेले होते. यावेळी चिखली येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. त्यांनी जाहीरसभेत मोबाइलवर एक ऑडिओ ऐकवून फडणवीसांवर निशाणा साधला. शेतकरी प्रश्नांवर फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनाबाबत हा ऑडिओ होता. फडणवीसांनी जनाची नाही तरी किमान मनाची लाज बाळगावी, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला होता.
या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं आहे. दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरेंवर खोचक टीका आहे. माणूस सातत्याने घरात राहिला की त्याला विसरण्याची सवय लागते. हा एक रोग आहे. उद्धव ठाकरेंना विसरण्याचा रोग झाला आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.
हेही वाचा- “नितू, निलू आगाऊ लेकरं,” सुषमा अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “नारायण राणेंनी संस्कार…”
उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना प्रसाद लाड म्हणाले, “स्वत:च्या सोयीनुसार विषय विसरण्याची सवय उद्धव ठाकरेंना लागली आहे. काल त्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो. मला उद्धव ठाकरेंना सांगायचंय आहे की, माणूस सातत्याने घरात राहिला की, त्याला विसरण्याची सवय लागते. हा एक रोग आहे, असं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ लोकं सांगतात. घरात राहिलेला माणूस लोकं विसरायला लागतो. तसा विसरण्याचा रोग तुम्हाला झाला आहे.”
हेही वाचा- “…तर आयुष्यभर उद्धव ठाकरेंचे पाय चेपू, त्यांनी फक्त…”, आमदार संजय गायकवाड यांचं जाहीर आव्हान!
“त्यामुळे कुठेही भाषण करताना किंवा देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना आपण काय बोललो आहोत? आपण काय बोललो होतो? आपण काय करणार होतो? आणि आपण काय केलं? यावर विचार करून बोला. त्यामुळे आम्हाला ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणायची गरज पडणार नाही, अशी खोचक टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.