BJP MLA Ram Kadam on Kunal Kamra : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने एक विडंबनात्मक कविता सादर करून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. यावरून आता शिंदे गटाचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी कुणाल कामरा याचा कार्यक्रम झाला त्या हॉटेलची तोडफोड केली आहे. पोलीस आता या तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मागावर आहेत. दरम्यान, कुणाल कामराच्या कवितेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे की “कुणाल कामरा ठाकरे गटाच्या सांगण्यावरून हे करत असावा.”

राम कदम यांनी काही वेळापूर्वी एएनआयशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाल कामरा काहीही बोलणार का? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तो जे काही बोलला आहे तो महाराष्ट्राच्या भूमीचा अवमान आहे. कुणाल कामरा हा ठाकरे गटाची सुपारी वाजवतोय का? तुम्ही त्याचं टायमिंग बघा. दिशा सालियन खून प्रकरणात ठाकरे कुटुंबाचं नाव पुढे आल्यानंतर लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी कुणाल कामरा याने ही वेळ निवडली आहे का?”

राम कदम नेमकं काय म्हणाले?

भाजपा आमदार राम कदम म्हणाले, “कुणाल कामरा ठाकरे कुटुंबाच्या सांगण्यावरून हे करतोय का? मला वाटतं की कुणाला कामरा जिथे कुठे दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळं फासण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र पोलीस व सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशी अभद्र भाषा तो वापरू शकत नाही.”

शिवसैनिकांकडून त्या हॉटेलची तोडफोड

कुणाल कामराची कविता व्हायरल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी रविवारी रात्री खार येथील द युनिकॉन्टिनेंटल मुंबई या हॉटेलवर हल्ला केला आणि तोडफोड केली. तसेच, या समर्थकांनी कुणाल कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्याला थेट धमकीही दिली आहे. कुणाल कामराविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी करण्यासाठी शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते विविध पोलिस ठाण्याबाहेर जमल्याचं पाहायला मिळालं. द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील खुर्च्यांची आणि संपूर्ण सेटची तोडफोड करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच खिल्ली उडवल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले.