सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील लवंगा गावात चार साधूंना जमावाकडून जबर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. मुलं चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरुन ही मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा आमदार राम कदम यांनी साधूंना करण्यात आलेल्या मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच हे केवळ फेसबुक लाइव्ह मुख्यमंत्र्यांचे सरकार नसून दोषींवर कारवाई होणार असं म्हणत कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. कदम यांनी याबाबत ट्वीटही केले आहे.
हेही वाचा- सांगलीत चार साधूंना बेदम मारहाण; पालघर घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली
ट्वीट करत राम कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
‘सांगलीमध्ये साधू संतांना जी दुर्दैवी मारहाण झाली. त्याच्यबरोबरच जो काही अभद्र प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. महाराषट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीत साधू संतांचा अपमान कधीही खपवून घेतला जाणार नाही. पालघर हत्याकांडात निर्दोष साधुंवर तत्कालीन फेसबुक लाइव्ह मुखमंत्री’. असं म्हणत राम कदमांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांडानंतर देशभरातील साधू रस्त्यावर उतरले होते. ठाकरे सरकारने त्या साधूंवर अन्याय केला. मात्र, एकनाथ शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये साधूंवर अन्याय होणार नाही. दोषींवर कारवाई होणारच. जरी साधूंनी कोणतीही तक्रार दाखल केली नसली तरी पोलिसांनी आरोपींविरोधीत तक्रार नोंदवून योग्य कारवाई करावी, अशी मागणी राम कदमांनी केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
उत्तरप्रदेशमधील मथुरा येथील चौघे साधू हे कर्नाटकला देवदर्शनासाठी आले होते. त्यानंतर ते विजापूरवरुन जत तालुक्यातल्या लवंगामार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान चारही साधूंनी रात्रीच्या सुमारास लवंगा गावातील एका मंदिरामध्ये मुक्काम केला होता. त्यानंतर सकाळी हे चौघेही साधू गाडीतून पंढरपूर मार्गे निघाले. मात्र, तत्पूर्वी त्यांनी गावातील एका मुलाला रस्ता विचारला. मात्र, त्या तरुणाला हे साधू मुलं चोरणारी टोळी असल्याचा संशय आला आणि त्याने ही माहिती गावकऱ्यांना दिली. याच संशयावरुन ग्रामस्थांनी या साधूंकडे चौकशी करायला सुरुवात केली.
साधू आणि ग्रामस्थांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी साधूंना गाडीतून बाहेर काढून बेदम मारहाण केली. त्यांना लाठी-काठी आणि पट्टयाने जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर साधूंची सुटका
या घटनेनंतर पोलिसांनी मध्यस्थी करत साधूंची जमावाच्या तावडीतून सुटका केली. या साधूंकडे असणारे आधारकार्ड आणि मध्य प्रदेशमधील त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर हे चौघे साधू खरंच देवदर्शनासाठी चालले असल्याचे समोर आले आहे. हा सगळा प्रकार गैरसमजूतीतून घडला असल्याचे तपासानंतर समोर आले. या मारहाणीनंतर साधूंनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केली नसून या संपूर्ण प्रकाराबाबत तातडीने अहवाल देण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांना दिले आहेत.