राज्यात विविध ठिकाणी दहीहंडी सण उत्सहात साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविदांचा ते उत्साह वाढवताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच घाटकोपर येथे भाजपा आमदार राम कदम यांच्या दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली.
यावेळी राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलग सात दिवस न झोपणारे व्यक्ती आहेत, अशा अर्थाचं विधान राम कदम यांनी केलं. तसेच एकनाथ शिंदे हे प्रचंड मेहनती असून ते कुणालाही कधीही भेटायला तत्पर असतात, असंही राम कदम म्हणाले.
हेही वाचा- “…ही सर्व नौटंकी आहे”, मनोज जरांगे यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय भेटीवर प्रकाश आंबेडकरांचं विधान
घाटकोपर येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना उद्देशून राम कदम म्हणाले, “मी मुख्यमंत्र्यांची खरी ओळख सांगू का? तुम्हाला ऐकायचंय का? मी प्रमाणिकपणे सांगतो, एकनाथ शिंदे हे अतिशय मेहनती आहेत. म्हणजे सात दिवस न झोपलेली व्यक्ती सांगा? असा जर प्रश्न आला तर मी मुख्यमंत्र्यांचं नाव घेईन. ते एक-दोन तासही झोपत नाहीत. खूप मेहनत करतात.”
हेही वाचा- “…तेव्हा संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंनी काय दिवे लावले?” गोपीचंद पडळकरांचं टीकास्र
“एकनाथ शिंदेंचं दुसरं वैशिष्ट्ये म्हणजे ते अत्यंत दिलदार व्यक्ती आहेत. त्यांना भेटण्यासाठी कुणी गरीब अथवा सफाई कामगार गेला, तर ते असं म्हणत नाहीत, की मी राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यांना कसं भेटू? ते पहाटे चार वाजेपर्यंत सगळ्यांना भेटतात आणि त्यांची कामं तातडीने करून देतात, असे मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत”, अशा शब्दात राम कदमांनी स्तुतीसुमनं उधळली.