राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. याशिवाय मास्कचा वापर देखील बंधनकारक नसणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर आरोग्यमत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहित देखील दिली. या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. दोन दिवसांपूर्वी निर्बंध लादू असं म्हणणाऱ्या या सरकारला रातोरात अशी काय अक्कल आली? असा सवाल करत. अखेर जनतेसमोर तीन पक्षाच्या सरकारला झुकावं लागलं. हा जनतेचा विजय आहे. असं त्यांनी म्हटलं आहे.
“महाराष्ट्राचं सरकार हिंदूंचा सण गुढीपाडवा, १४ एप्रिल रोजीची डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची मिरवणुकीवर निर्बंध घालायला निघालं होतं. ज्यावेळी आम्ही ठणकावून सांगितलं की तुमचे निर्बंध चुलीत जाळून खाक करू, तुमचे निर्बंध आम्ही मानणार नाही. आंबेडकर जयंतीच्या मिरवणूका देखील जोरात निघतील. गुढीपाडवा, रामनवमी देखील उत्साहात साजरी होईल. असं आम्हाला ठणकावून सांगण्याची वेळ का आली? हेच सरकार दोन दिवसांपूर्वी म्हणत होतं की आम्ही निर्बंध लादू, तेव्हा काय अक्कल गहाण ठेवली होती? आता रातोरात कशी काय अक्कल आली? ” असं राम कदम यांनी एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
तसेच, “आता रातोरात त्यांना निर्बंध यासाठी मागे घ्यावे लागत आहेत, की आम्ही सांगितलं की तुमचे निर्बंध आम्हाला चुलीत जाळून खाक करावे लागतील. जनतेचा प्रक्षोभ पाहून आज निर्बंध मागे घ्यावे लागले आहेत. हा जनतेचा विजय आहे. तीन पक्षाच्या सरकारला झुकावं लागलं.” असंही राम कदम म्हणाले आहेत.
मोठी बातमी! राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध हटवले; मास्क देखील ऐच्छिक!
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाने उद्यापासून अर्थात १ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही”, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.