भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी अहमदनगरमधील धर्मांतरांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना हिंदूविरोधी म्हटलं. तसेच होत असल्याचा आरोप केला. तसेच मटक्यावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? असा सवाल केला. तनपुरे यांच्या नेतृत्वात राहुरीत पोलीस अधिकाऱ्याच्या तडकाफडकी बदलीविरोधात काढलेल्या सर्वपक्षीय आंदोलनाचं ट्वीट रिट्वीट करत सातपुतेंनी ही टीका केली.
राम सातपुते यांनी म्हटलं, “तनपुरे मटकावाले, वाळुमाफीया आणि ख्रिश्चन मिशनरींचे हस्तक घेऊन काढलेला मोर्चा जनक्षोभ कसा? थोड थांबा तनपुरे २०२४ ला राहुरी मतदारसंघातला हिंदू तुमच्या विरोधात नक्कीच हिंदू एकता दाखवेल. असल्या भाड्याने आणलेल्या गर्दीला हे सरकार भीक घालणार नाही. तनपुरे = हिंदूविरोधी.”
प्राजक्त तनपुरेंनी काय ट्वीट केलं होतं?
प्राजक्त तनपुरे यांनी ट्वीट करत म्हणाले होते, “राहुरी शहरातील पोलीस स्थानकात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक प्रताप दराडे यांची शासनाने तडकाफडकी बदली केली आहे. त्याच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांच्या व विविध संघटनांच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.”
“दराडे यांच्या कार्यकाळात राहुरीतील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट”
“या आंदोनाला माता भगिनींनी लक्षणीय उपस्थिती दर्शविली. दराडे यांच्या कार्यकाळात राहुरीतील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली होती. विशेषतः महिलांनी त्यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे. तरूण मुलींच्या छेडछाडीचे प्रकार कमी करण्यासाठी त्यांनी प्रभावी मोहिम राबवलेली होती,” असं प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं होतं.
“पोलीस निरिक्षकांची कोणतीही चौकशी न करता तडकाफडकी बदली”
तनपुरे पुढे म्हणाले, “दराडे यांनी अनेक गुन्ह्यांचे तपासही अल्पावधीत पूर्ण केले होते. असे असतानाही कथित प्रकरणांवरून कोणतीही चौकशी न करता शासनाने त्यांची बदली केली. हे योग्य नाही. या बदलीच्या निषेधार्थ राहुरी येथे रस्ता रोको आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहिले. तसेच दराडे यांना पाठिंबा दर्शवला.”
हेही वाचा : दिशा सालियनच्या वडिलांना माध्यमांशी बोलू न दिल्याचा आरोप, संजय राऊत म्हणाले, “सुपारीबाज लोक…”
“चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही”
“राहुरीकर एका चांगल्या अधिकाऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही. या जनक्षोभाची शासनाने दखल घेऊन प्रताप दराडे यांची करण्यात आलेली बदली रद्द करावी,” अशी मागणी प्राजक्त तनपुरे यांनी केली होती.