सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार राम सातपुते यांचा काँग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी मोठ्या मताधिक्यांनी पराभव केला. यानंतर आमदार राम सातपुते यांनी आज सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी आमदार राम सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. “इतना भी गुमान मत कर तेरी जीत पर क्यो की तेरी जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है”, असा खोचक टोला राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना लगावला. ते माध्यमांशी बोलत होते.
राम सातपुते काय म्हणाले?
“सोलापूरच्या जनतेचे आभार मानण्यासाठी मी आज आलो आहे. सोलापूरच्या जनतेनं आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. आम्ही पराभव मोठ्या मनाने स्वीकारला आहे. सोलापूरच्या जनतेशी आमचे त्रुणानुबंध आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या पराभवामधून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, आमच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे काम केलं, त्यांचं कौतुक करायला हवं”, असं राम सातपुते यावेळी म्हणाले.
हेही वाचा : ‘तुम्ही विधानसभेची स्वप्नं पाहू नका, कारण महायुतीत…’, अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
“सर्वात महत्वाची गोष्ट असते की, माणसाला पराभव पचवता आला पाहिजे. तसंच विजय देखील पचवता आला पाहिजे. मात्र, विरोधकांना विजय पचवता येत नाही. कारण त्यांना अहंकार आला असून त्यातून वाचाळ बडबड त्यांची सुरु आहे. सोलापूरच्या जनतेचे प्रश्न त्या कधीही सोडू शकत नाहीत, असं वाटतं. त्या फक्त स्टंटबाजी करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत”, अशी टीका राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर केली.
सातपुते पुढे म्हणाले, “चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोलापूरच्या खासदारांनी ज्या प्रकारे उल्लेख केला, त्याचा मी निषेध करतो. चंद्रकांत पाटील यांच्या वयाचा त्यांनी विचार करायला हवा होता. मात्र, राजकीय संस्कृती त्यांना नाही. त्या ज्या पद्धतीने भाषा वापरतात, ज्या पद्धतीची स्टंटबाजी करतात. हा येथील खासदारांचा स्वभाव आहे. इतना भी गुमान मत कर तेरी जीत पर क्यो की तेरी जीत से ज्यादा मेरे हार के चर्चे है”, असा खोचक टोला राम सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना लगावला.