राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. रोहित पवारांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला होता. राम शिंदे यांना हरवून रोहित पवार पहिल्यांदा आमदार झाले. पण हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबतचं सूचक विधान भाजपाचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी केलं.
कर्जत-जामखेड मतदार संघात कधीही निवडणूक लावली तर आपण ही निवडणूक लढणार आहोत. तसेच त्याच पद्धतीने जिंकण्यासाठी तयारीही आपण केली आहे, अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली. त्यामुळे रोहित पवारांचा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपाकडून काही मास्टरप्लॅन आखला जात आहे का? याबाबतच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा- “…तर मी मरून जाईल, कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहावी लागेल”, अजित पवार असं का म्हणाले?
कर्जत-जामखेडमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राम शिंदे म्हणाले की, राजकारण आणि निवडणुकांमध्ये नेहमी सतर्क राहीलं पाहिजे. त्यामुळे आम्ही पहिल्यापासून अलर्ट आहोत. कर्जत -जामखेडची निवडणूक केव्हाही आणि कधीही लागली तर आपण ती निवडणूक लढणार आहे. त्याच पद्धतीने ही निवडणूक जिंकण्याची तयारीही आपण करून ठेवली आहे, असंही आमदार शिंदे म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
रोहित पवारांवर अप्रत्यक्ष टीका करताना राम शिंदे पुढे म्हणाले, “गेल्या दोन-अडीच वर्षात लोकांना वाईट अनुभव आला आहे. एवढ्या मोठ्या घराण्यातील व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलं. पण त्यांच्याकडून लोकांना दिलासा देणं, त्यांच्या दु:खात व अडचणीत सहकार्य करणं… असं काहीही झालं नाही. फक्त सोशल मीडिया, पोस्टर बॉय आणि इव्हेंट मॅनेजमेंट एवढाच प्रकार मतदारसंघात झाला. अनेक प्रकल्प अडवण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे लोकांना जी स्वप्नं दाखवली होती, ती सर्व धुळीस मिळाली. त्यामुळे आता कधीही निवडणूक जाहीर झाली तर आपण लढायला तयार आहोत.”