सोलापूर : ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे नातू आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र विश्वतेजसिंह यांचा शाही विवाह सोहळा अकलूजमध्ये लाखो जनसमुदायाच्या साक्षीने मोठ्या दिमाखात झाला. यावेळी अनेक ज्येष्ठ राजकीय नेत्यांसह विविध राजघराण्यांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती.

विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडांगणावर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे सुपुत्र विश्वतेजसिंह यांचा शाही विवाह उदयसिंह सरनाईक (चिखली, जि. वाशीम) यांची कन्या शिवांतिका यांच्याशी झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत खासदार शाहू महाराज, सातारचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, कल्पनाराजे भोसले, नागपूरचे छत्रपती संग्रामसिंहराजे भोसले, युवराज शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह इतरांनी उपस्थिती लावली होती. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पर्यटन व खनिकर्ममंत्री शंभूराज देसाई, क्रीडा राज्यमंत्री दत्ता भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संजीवराजे नाईक-निंबाळकर, विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर, शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, विश्वविजय खानविलकर, आमदार विश्वजीत कदम, खासदार नीलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे आदींसह अनेक आजी-माजी आमदार-खासदारांचीही उपस्थिती होती. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते. या शाही सोहळ्यात एक लाखापेक्षा अधिक जनसमुदाय हजर होता. त्यासाठी नेटके नियोजन आखण्यात आले होते. विवाह सोहळा संपन्न होण्यापूर्वी निघालेल्या नवरदेवाची देखणी वरात काढण्यात आली होती. यात मुंबईच्या दोनशे कलावंतांच्या नृत्याचा आविष्कार घडला. पारंपरिक लेझीम पथकासह हलगी पथक लक्षवेधी ठरले. या विवाह सोहळ्यात गेल्या १५ दिवसांपासून अकलूजमध्ये दररोज १५ ते २० हजार व्यक्तींना जेवण देण्यात आले.

५३ वर्षांपूर्वी १९७१ साली सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचे सुपुत्र विजयसिंह यांचा शाही विवाह सोहळा ‘लक्षभोजना’मुळे संपूर्ण देशात गाजला होता. त्यानंतर १९९५ साली विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांचा विवाह सोहळाही मोठ्या थाटात झाला होता. त्यानंतर मोहिते पाटील घराण्यातील चौथ्या पिढीतील विश्वतेजसिंह यांचाही विवाह सोहळा तेवढ्याच थाटामाटात पार पडला. विजयसिंह मोहिते-पाटील, त्यांचे सुपुत्र रणजितसिंह आणि नातू विश्वतेजसिंह या तिघांच्याही विवाह सोहळ्यात शरद पवार आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांनी हजेरी लावल्याचा योगायोग पाहायला मिळाला.

भाजप नेत्यांनी फिरविली पाठ

आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजपमधील भवितव्याविषयी गेले तीन महिन्यांपासून गूढ कायम आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुपुत्राच्या विवाह सोहळ्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी आदींसह भाजपच्या अनेक नेत्यांना समक्ष भेटून निमंत्रण पत्रिका दिली होती. परंतु प्रत्यक्षात या विवाह सोहळ्याकडे भाजपच्या बहुसंख्य नेत्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्याची चर्चा विवाह सोहळ्यात ऐकायला मिळाली. तथापि, या विवाहानंतर लवकरच मुंबईत स्वागत सोहळा पार पडणार आहे. त्यावेळी भाजपसह महायुतीची नेते मंडळी हजर राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Story img Loader