राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून दोन आठवडे उलटले असून नुकतंच खातेवाटपही झालं आहे. या खातेवाटपात अजित पवार यांना अर्थखातं मिळाल्यामुळे त्यावरून राजकीय टोलेबाजी सुरू झाली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणारे शिंदे गट व भाजपानं त्याच राष्ट्रवादी काँग्रेसला व अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घेतल्यानं विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी खोचक ट्वीट करून भाजपा, शिंदे गट व अजित पवार गटाला लक्ष्य केलं होतं. आता त्याला भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
काय होत रोहित पवारांचं ट्वीट?
रोहित पवारांनी आज सकाळी लोणावळा घाटातील एका ट्रकचा फोटो ट्वीट केला होता. “लोणावळ्यात ट्रकमधलं हे अवाढव्य रेल्वे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली. स्वतःही वेग घेईना आणि दुसऱ्याच्या मार्गात अडथळा आणल्याने इतर प्रवाशांनाही पुढं जाऊ देईना. खरंतर रेल्वे इंजिन रुळावर पाहिजे पण हे आलं रस्त्यावर. आणि मार्ग चुकला तर स्वतःच्या बळावर चालण्याऐवजी दुसऱ्यांच्या खांद्यावर बसून चालण्याची वेळ येते. जसं राजकारणासाठी भाजपने चुकीचा मार्ग निवडलाय. आता या इंजिनाचा बोजा अंगावर घेतलेल्या ट्रकचा चालक ठाण्याचाच आहे का आणि ट्रकची चेसी बारामतीलाच तयार झालेली आहे का, हे मात्र तपासावं लागेल”, असं ट्वीटमध्ये रोहित पवारांनी म्हटलं आहे.
“हे इंजिन पाहताच भाजपाची आठवण झाली”, रोहित पवारांचा खोचक टोला; ‘तो’ फोटो केला शेअर!
दरम्यान, अक्कलकोटचे भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी रोहित पवारांच्या या ट्वीटला खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. आधी तुमच्या गटाचे दोन अंकी खासदार निवडून आणा, मग बोलू या विषयावर, असं आव्हानही सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलं आहे. “रोहितजी, दुसऱ्याच्या खांद्यावर बसून राजकारण करण्याविषयी तुम्ही भाष्य करताय हेच मुळात हास्यास्पद आहे! जन्मापासून ते आजतागायत तुम्हाला सत्तेसाठी टेकू घ्यावा लागलाय हे सोयीस्कररीत्या विसरताल वाटतं”, असं सचिन कल्याणशेट्टी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
“लोकसभेत दोनपासून ३०३ जागा जिंकून आणणाऱ्या भाजपाला मोफत उपदेश देण्याआधी तुमच्या गटाचे दोन अंकी खासदार निवडून आणा, मग बोलू या विषयावर”, असंही या ट्वीटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी म्हटलं आहे.