भाजपा नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. एका सभेमध्ये वंशवादावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत एक विधान केले. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते मला संपवू शकत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, पंकजा यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून भाजपाचे आमदार संजय कुटे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. सभेत बोलताना पंकजा मुंडे यांच्या तोंडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव ओघाओघाने आले, असे संजय कुटे यांनी सांगितले आहे. ‘टीव्ही ९ मराठी’ने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.
हेही वाचा >> “पंकजा मुंडेंनी मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर…” एकनाथ खडसेंचं मोठं विधान!
पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तसे विधान केलेले नाही. मी त्यांचा पूर्ण भाषण ऐकलं आहे. त्या वंशवादावर बोलत होत्या. जो माणूस सर्वसामान्य लोकांच्या मनात असतो, त्याला कोणीही संपवू शकत नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तो विषय असल्यामुळे तसे विधान जोडले गेले. पंकजा मुंडे यांच्या मनात तसे काहीही नाही. एखाद्याच्या घरात वडील आणि मुलांनाही तिकीट दिले आणि जनतेने त्याला पाठिंबा दिल्यास वंशवाद म्हणता येणार नाही. पक्ष माझ्याच घरात चालणार. मीच अध्यक्ष, त्यानंतर माझा मुलगा अध्यक्ष, पुढे त्याचा मुलगा अध्यक्ष याला वंशवाद म्हटले जाते. भारतीय जनता पक्ष तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वंशवादावर स्पष्ट भूमिका आहे. पंकजा मुंडे यांना तसे म्हणायचे नव्हते. मात्र ओघाओघातून त्यांच्या तोंडून मोदी यांचे नाव निघाले. त्यामध्ये दुसरं काहीही नाही, असे भाजपाचे आमदार संजय कुटे म्हणाले.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?
“आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपारिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलिकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीही वंशवादाचं प्रतिक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते मला संपवू शकत नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.