सातारा जावळीचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. दरम्यान, शिवेंद्रराजे यांनी पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, पवारांसोबत झालेल्या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, तर रखडलेल्या विकास कामांबाबत चर्चा झाल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

सातारा येथे एमआय़डीसीमध्ये बजाज कंपनीकडे चाळीस एकर जागा आहे. बजाज यांनी स्वतः कंपनी सुरू करावी किंवा जागा खाली करून दुसऱ्यासाठी द्यावी, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र स्कूटरचा प्रकल्पाबाबत बजाज यांची लवकर भेट घेऊ, अशी ग्वाही शरद पवार यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिली.कोणत्याही व्यक्तीवर टीका करीत असताना तारतम्य बाळगलं पाहिजे, असे गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर केलेल्या टिकेवर त्यांनी मत व्यक्त केले.

उद्योग विभागाच्या मॅग्नेटिक महाराष्ट्र योजनेत साताऱ्यातील देगांव, निगडी या नवीन एमआयडीसींचा समावेश करावा, अशी मागणी करताना आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.

मॅग्नेटिक महराष्ट्र या योजनेत सातारा शहरालगत देगाव, निगडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर असून जमिनीवर तसे शिक्के मारले आहेत. या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याची पडीक आणि माळरान नापीक जमीन विविध उद्योगांसाठी उपलब्ध होईल. योग्य मोबदला मिळाला तर शेतकरीही जमीन देण्यास तयार आहेत. त्यामुळे या नवीन एमआयडीसीचा समावेश मॅग्नेटिक महाराष्ट्रमध्ये करावा. भुसंपादनाची प्रकीया सुरु करावी. अशी मागणी त्यांनी शरद पवार व अजित पवार यांच्याकडे केल्याचे सांगितले, पण राजकीय चर्चा झाली नाही असे ते म्हणाले.

Story img Loader