शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेच्या काही आमदारांसोबत सूरतमधल्या एका हॉटेलमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर राज्यात सत्तापालटाची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदेंची ही बंडखोरी आहे का? ती झाल्यास सरकारला किती मोठा फटका बसेल आणि भाजपा पुन्हा सत्तेत येईल का? यावरून चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात बोलताना भाजपाचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राज्यातील सत्तापालटाविषयी मोठं भाकित केलं आहे.
नेमकं झालंय काय?
एकनाथ शिंदे सकाळपासूनच नॉट रीचेबल असल्याचं समोर आल्यानंतर राज्यात तर्कवितर्कांना उधाण आलं. सोमवारी लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मतं फुटल्याचं स्पष्ट झाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळू लागले होते. त्यात आज सकाळपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार नॉट रीचेबल झाल्यामुळे राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
एकनाथ शिंदेंच्या भूमिकेनंतर दिल्लीत घडामोडींना वेग; अमित शाह-जे.पी. नड्डांची तातडीची बैठक!
दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचा अल्टिमेटम दिला असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राजकीय भाकित वर्तवलं आहे. विधान परिषदेमध्ये मिळालेल्या विषयाचा आनंद उत्सव साताऱ्यातील मोती चौक येथे कंदी पेढे वाटप करून करण्यात आला त्यावेळेला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे माध्यमांशी बोलत होते.
“फडणवीस योग्य वेळी निर्णय कळवतील”
“देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून चर्चा सुरू असेल. योग्य वेळी ते निर्णय कळवतील”, असं यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले आहेत. राज्यात सरकार आल्यापासून त्याबद्दल नाराजी असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं.
मविआ सरकार अस्थिर: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्र्यांना तीन प्रस्ताव दिल्याची चर्चा, बोलणी फिसकटली तर…
“तीन पक्षांच्या सरकारमध्ये एकमत दिसत नाही. कालच्या प्रकारामुळे हे उघड झालं आहे. त्यामुळे पुढे हे सरकार टिकेल किंवा नाही या गोष्टी लवकरच कळतील. गेल्या दोन निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नियोजन आम्ही बघितलं आहे. देवेंद्र फडणवीस शांत बसतील असं आम्हाला वाटत नाही. त्यांचं नियोजन योग्य पद्धतीने सुरूच असेल. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. लवकरच परिवर्तन बघायला मिळेल”, असं भोसले म्हणाले आहेत.