एकाच दिवसात संजय राऊत यांच्यात इतका फरक पडेल अशी अपेक्षा नव्हती. इतक्या लवकर एम टीव्हीचं आस्था चॅनल होईल असं वाटलं नव्हतं. लगेच आमच्या देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होईल आणि एवढं तोंड पडलेलं दिसेल असं खरंच वाटलं नव्हतं असं म्हणत भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार म्हटल्यावर यांचे डेसिबलच कमी झाले, माझ्यासाठी गोष्टी इतक्या सोप्या करु नका असंही नितेश राणे म्हणाले आहेत. एवढंच नाही तर संजय राऊत यांना शिवसेनेची स्थापना कधी झाली ते पण माहित नाही असं म्हणत नितेश राणेंनी व्हिडीओही दाखवला आणि टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे नितेश राणेंनी?

मी संजय राऊत यांना सांगेन की उद्या जरा थोडा आव आणा, आणखी टीका करा. असं केलं की तुमच्या मालकालाही कळेल की आमचा नाही. पण नेमका कुणाचा आहे? आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत जे बोलले त्यावर मी बोलणार आहे. बारसूचा विषय त्यांनी काढला. आत्तापर्यंत महाराष्ट्रात जोरजोरात बोलणारे संजय राऊत असंही सांगायचे की मी पवारांचा माणूस आहे. पण आज ते आदरणीय शरद पवार यांच्या भूमिकेलाच विरोध करताना दिसले. तुम्ही उद्धव ठाकरेंचेही नाहीत आणि शरद पवारांचे नाहीत. संजय राऊत राजकारणातले लावारिस आहेत का? असा प्रश्न मला विचारायचा आहे.

आम्ही पण सात बारासह नावं जाहीर करु

बारसूचे जमीनदार आहेत त्यांच्या याद्या जाहीर करणार सांगितलं आहे. माझं तर म्हणणं आहे नक्की करा. काही याद्या आम्हीही जाहीर करतो. जेव्हा बारसूचा विषय सुरु झाला तेव्हा माजी खासदार निलेश राणेंनी काही नावं घेतली होती त्यात बारसूमध्ये कुणाची जमीन आहे ते सांगितलं होतं. काही जमिनी या ठाकरेंशी संबंधित कशा आहेत? हेदेखील सांगितलं होतं. काही नावं जाहीर केली होती. विनायक राऊत किंवा संजय राऊत यांना नावं जाहीर करायची असतील आणि मालकांना अडचणीत आणायचं असेल तर हरकत नाही. आम्ही पण उद्धव ठाकरेंशी निगडीत लोकांच्या जमिनी कशा आहेत ते आम्ही जाहीर करणार. आम्ही सगळेजण. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार हे सगळे स्पष्ट बोलत आहेत की स्थानिकांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प होईल. संजय राऊत यांना मालकांना अडचणीत आणायचं तर आणावं.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या कुटुंबांना अडचणीत आणायचं आहे असं संजय राऊत यांना दिसतं आहे. कारण राष्ट्रवादीशी निगडीत कारखान्यांचीही चौकशी त्यांना हवी आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचं ओझं भाजपाला झालं आहे असंही बोलले. मी तर हेच म्हणेन की उद्धव ठाकरेंचं ओझं महाविकास आघाडीवर झालं आहे. माझ्या माहितीनुसार १ मे रोजी होणारी सभा ही मविआची शेवटची वज्रमूठ सभा असेल अशी माझी माहिती आहे. यावर राऊत यांनी बोलावं.

संजय राऊत यांना शिवसेनेची स्थापना कधी झाली ते पण माहित नाही

संजय राऊत हे स्वतःला शिवसैनिक समजतात. शिवसेनेबद्दल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल मोठमोठ्या बाता करतात. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीखही माहित नाही. शिवसेना स्थापन झाली ती तारीख आणि वर्ष माहित नाही त्यांना बाळासाहेबांबद्दल आणि शिवसेनेबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का ? असा माझा प्रश्न आहे. मी राजकीय आरोप करत नाही. माझ्याकडे व्हिडीओच्या रुपात पुरावा आहे. महाराष्ट्राला हे समजलं पाहिजे की संजय राऊत यांना शिवसेनेच्या स्थापनेचं वर्ष माहित नाही, त्याने आम्हाला शिकवू नये. संजय राऊत ओरिजनल शिवसैनिक नाही. चायनीज मॉडेल आहे अशी टीका पुन्हा एकदा नितेश राणे यांनी केली.

नितेश राणेंनी दाखवलेल्या व्हिडीओत काय आहे?

नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा एक व्हिडीओ दाखवला आहे. त्यात ते म्हणतात की भाजपाची स्थापना १९८० च्या आसपास झाली. तर शिवसेनेची स्थापना १९६९ मध्ये झाली. ही ओळ संजय राऊत यांनी म्हटल्याचं नितेश राणेंनी माध्यमांना दाखवलं आणि त्यानंतर म्हणाजे की शिवसेनेची स्थापना १९ जून १९६६ ला झाली आहे. संजय राऊत हा स्वतःला शिवसैनिक म्हणवतो आणि त्याला हेदेखील माहित नाही आणि आम्हाला शिकवतो आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla shows video and taunt sanjay raut a person who does not know when shiv sena was formed scj
Show comments