राज्यामध्ये सध्या मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या लिखाणावरुनही मोठा वाद निर्माण झालाय. एकीकडे राज ठाकरेंनी पुरंदरेंमुळे घराघरात छत्रपती शिवाजी महाराज पोहचल्याचे सांगताना दुसरीकडे शरद पवारांनी मात्र पुरंदरेंनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिल्याचा आरोप केलाय. आता यावरुन जेम्स लेनने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुरंदरेंसोबत आपलं बोलणं झालं नसल्याचा दावा केलाय. यावरुनच आता भाजपानेही या प्रकरणात उडी घेतली असून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पवारांवर या मुद्द्यावरुन निशाणा साधलाय.

नक्की वाचा >> “…तेव्हा राज ठाकरेंनी जेम्स लेनसोबतच्या लेखकाची माफी मागितलेली”; पवार विरुद्ध राज वादात संभाजी ब्रिगेडची उडी

राज ठाकरे नेमकं काय म्हणालेले?
“बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण? तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिलं, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिलं. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. पण बाबासाहेब पुरंदरेंमुळे घराघरात शिवाजी महाराज पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु आहेत,” असा आरोप राज ठाकरेंनी ठाण्यातील सभेमधील भाषणातून केला होता.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पवारांनी काय उत्तर दिलं?
“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहास वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला होता. शिवाजी महाराजांना जिजामातांनी घडविले. पण, त्यांना दादोजी कोंडदेव यांनी घडविले, असं पुरंदरे यांनी लिहून ठेवलं होतं. जेम्स लेनने शिवाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण केले त्याची माहिती बाबासाहेब पुरंदरे यांनी पुरविली होती, असा उल्लेख लेनच्या पुस्तकात आहे. त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नव्हता. यातूनच मी पुरंदरे यांच्यावर टीकाटिप्पणी केली होती व त्याबद्दल मला अभिमान आहे,” असं शरद पवार यांनी म्ह़टलं होतं. यानंतर मनसेने २००३ साली बाबासाहेब पुरंदरे आणि देशातील इतर नामांकित इतिहासकारांनी लिहिलेलं एक पत्रच जाहीर करत शरद पवारांनी माफी मागावी अशी मागणी केली.

जेम्स यांचं स्पष्टीकरण…
जेम्स लेन यांनी १६ एप्रिलला इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत २००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ (Shivaji: Hindu King in Islamic India) या पुस्तकासाठी पुरंदरे माहितीचे स्त्रोत नव्हते असा खुलासा केला आहे. पुस्तकातील वादग्रस्त माहिती तुम्हाला कोणी पुरवली याबद्दल विचारण्यात आलं. “तुम्ही हा प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. कोणीही मला माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक कथा आणि लोक त्या कशा सांगतात; त्या कथा सांगणाऱ्या लोकांच्या मूल्यांबद्दल आपल्याला काय सांगू इच्छितात याबद्दल होतं. उदाहरणार्थ, काही लोक शिवाजी महाराजांचा संबंध रामदास गुरुंसोबत जोडतात तर काहीजण तुकाराम महाराजांसोबत. यापैकी कोणती माहिती योग्य आहे आणि एक गट ‘अ’ कथानकाला का पसंती देतो आणि दुसरा गट ‘ब’ ला का यात मला रस नाही,” असं उत्तर जेम्स लेन यांनी दिलं.

तुम्हाला मिळालेल्या माहितीचा आधार काय होता? असं विचारण्यात आलं त्यावरही जेम्स यांनी स्पष्टीकरण दिलं. “जो कोणी माझं पुस्तक नीट वाचेल त्याला मी कोणताही ऐतिहासिक दावा करत नसल्याचं लक्षात येईल. मी शिवाजी महाराजांचा अपमान केला अशी टीका करणाऱ्यांनी नीट वाचलेलं नाही. पुन्हा सांगतो की मी फक्त कथा सांगतो, ऐतिहासिक तथ्य नाही,” असं जेम्स यांनी स्पष्ट केलं.

तुम्ही कधी बाबासाहेब पुरंदरेंसोबत चर्चा केली केली का? आणि केली तर त्यांचा प्रतिसाद कसा होता? असं विचारण्यात आलं असता जेम्स लेन यांनी आपली कधीच एका शब्दानेही त्यांच्याशी चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.

जेव्हा तुम्हाला त्या टिप्पणीबद्दल खेद वाटला आणि ते परत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तुमच्या मनात काय चालले होते? असं विचारलं असता ते म्हणाले की, “मी माझे युक्तिवाद करताना अधिक सावधगिरी बाळगली नाही आणि त्याचा परिणाम म्हणून इतरांना त्रास सहन करावा लागला याची खंत होती.”

बाबासाहेब पुरंदरे तसंच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती केलेल्या योगदानाकडे कसं पाहता? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “पुरंदरे हे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात प्रख्यात समर्थक होते आणि त्याबद्दल ते बराच काळ कौतुकास्पद काम करत होते. १८ व्या आणि १९ व्या शतकातील राजकीय लिखाणावरुन आज त्यांच्यावर टीका केली जात आहे, जेव्हा शिवाजी महाराजांच्या वंशजांना काही ब्राह्मणांनी खरे क्षत्रिय मानण्यास नकार दिला होता. त्यानंतरच मराठा आणि ब्राह्मण इतिहासाच्या लेखनात वाद निर्माण झाला”.

जवळपास दीड दशकांनंतरही पुस्तकाबाबतच्या वादग्रस्त बातम्या वाचून तुम्हाला काय वाटतं? अशी विचारणा केली असता त्यांनी पुस्तक वादाचं साधन झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. “छत्रपती शिवाजी महाराज हे महान वीर होते. पण मला खेद वाटतो की त्यांचे चरित्र हा विद्वत्तेचा विषय नसून समकालीन राजकीय वादाचं साधन झालं आहे,” असं लेन म्हणाले.

भाजपाने साधला निशाणा
या सर्व प्रकरणानंतर आणि विशेष करुन लेन यांनी मुलाखत समोर आल्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातळखकर यांनी या मुलाखतीची लिंक शेअर करत शरद पवारांचा खोटारडेपणा उघड पडल्याचा टोला लगावलाय. “घ्या शरद पवारांचा खोटारडेपणा पुन्हा उघड झाला. ज्या मुद्यावरून पवारांनी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद पेटवला तो मुद्दाच निकाली निघाला,” असं भातखळकर म्हणाले. तसेच पुढे बोलताना, “‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’चा लेखक जेम्स लेन याने आपण बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधी बोललोच नव्हतो असे स्पष्ट केलय,” असंही भातखळकर यांनी मुलाखतीचा संदर्भ देत सांगितलंय.

“आता महाराष्ट्रात विनाकारण पेटवपेटवी केल्याबद्दल आणि सातत्याने शिवशाहिरांबाबत गरळ ओकल्याबद्दल शरद पवार माफी मागणार आहेत का?,” असा प्रश्नही भातखळकर यांनी उपस्थित केलाय. तसेच, “राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याबद्दल पवारांविरुद्ध कारवाई व्हावी,” असंही ते म्हणालेत.

२००३ मध्ये झालेला वाद
२००३ मध्ये जेम्स लेन यांचं पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जेम्ल लेन यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत पुण्यातील भंडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यू़टवर हल्ला केला होता. २००४ मध्ये महाराष्ट्र सरकारने पुस्तकावर बंदी घातली. महाराष्ट्रातील गदारोळानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनेही हे पुस्तक मागे घेतले होते. मात्र या पुस्तकामुळे निर्माण झालेले वाद अद्यापही जिवंत आहेत.

Story img Loader