उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यात जी चर्चा झाली त्यावरून त्यांची खिल्ली उडवली आहे. “ऋषी सुनक यांच्याबरोबर फोटो काढला. काय बोलले त्यांना? कोणत्या भाषेत बोलले?” अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची उडवली आहे. ते जळगावमध्ये सभेत बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी याच टीकेवरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
काय म्हटलं आहे अतुल भातखळकर यांनी?
आपले ४० आमदार शुद्ध मराठीत काय बोलत होते हे ज्यांना कळलं नाही ते आज ब्रिटनचे पंतप्रधान कोणत्या भाषेत बोलले याची काळजी करताहेत. किती ही जळजळ…असा प्रश्न विचारत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.
२१ जून २०२२ या दिवशी महाराष्ट्रात सर्वात मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेच्या नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याने हे घडलं. उद्धव ठाकरेंनी २९ जून २०२२ ला राजीनामा दिला आणि ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. पुढे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंना दिला. एकनाथ शिंदेंनी शिवसेना सोडल्यापासून त्यांचा उल्लेख गद्दार आणि मिंधे असाच ठाकरे गटाकडून केला जातो आहे.
सध्या राज्यात परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादीचीही दोन शकलं झाली आहेत आणि शिवसेनेचीही. शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा मोठा गट सत्तेत आहे कारण त्यांनी भाजपासह हातमिळवणी केली आहे. जेव्हा संधी मिळते तेव्हा भाजपाचा एकही नेता ४० आमदारांनी तुमची साथ कशी सोडली हे उद्धव ठाकरेंना ऐकवतो. आज अतुल भातखळकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनचं कार्ड ट्विट करत उद्धव ठाकरेंवर कडवी टीका केली आहे. ४० आमदार शुद्ध मराठीत घुसमट होते आहे हे सांगत होते पण ते तुम्हाला समजलं कसं नाही? असा खोचक प्रश्न अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.