सोलापूर : मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषणास बसलेल्या  मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावत असताना सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाले आहे. भाजपचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शासकीय विश्रामगृहातून आणि नंतर जिल्हा परिषदेतून अक्षरशः पिटाळून लावण्यात आले. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना घेराव घालत खडे बौल सुनावण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुसरीकडे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे आमरण उपोषणास बसलेले सोमनाथ राऊत यांची प्रकृती बिघडली तरी त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे. या गावातील शंभरपेक्षा अधिक तरूणांनी सामूहिक मुंडन करून साखळी उपोषण सुरू केले आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या कोडी गावातील संतप्त मराठा आंदोलकांनी महामार्गावरील पेट्रोल पंपांवर इंधन कंपन्यांच्या फलकावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांना काळे फासण्यात आले. मोदी यांच्या प्रतिमा उलट्या टांगून घोषणा देण्यात आल्या. रस्त्यावरील एसटी बसेस अडवून त्यावरिल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रतिमांनाही काळे फासण्यात आले. उत्तर सोलापूरसह मंगळवेढा, बार्शी आदी भागातही असाच उद्रेक दिसून आला.

हेही वाचा >>> प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक, वाहनांची जाळपोळ; भाजपाचे मंत्री म्हणाले, “गावबंदीपर्यंत समजू शकत होतो, पण…”

दरम्यान, जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाची व्याप्ती वाढत असतानाच सकाळी भाजपचे कोकण विभागातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षकांच्या प्रश्नावर आढावा बैठक घेण्यासाठी आले होते. तेव्हा प्रथम शासकीय विश्रामगृहातून त्यांना प्रचंड घोषणाबाजी करीत अक्षरशः हुसकावून लावण्यात आले. परंतु त्यानंतर हेच आमदार म्हात्रे पुन्हा जिल्हा परिषदेत येऊन बैठक घेत असल्याचे कळल्यानंतर मराठा आंदोलक संतप्त झाले आणि त्यांनी जिल्हा परिषदेकडे मोर्चा वळवून तीव्र संताप व्यक्त केला. भाजपचे हेमंत पिंगळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजन जाधव, काँग्रेसचे विनोद भोसले, गणेश डोंगरे, प्रा. गणेश देशमुख, रवी मोहिते, उध्दव ठाकरेचलित शिवसेनेचे अजय दासरी, प्रताप चव्हाण आदींनी आमदार म्हात्रे यांच्याशी बरीच हुज्जत घालून त्यांना परत पाठविले.

हेही वाचा >>> “भारतीय न्यायव्यवस्था अत्यंत…”, आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर जयंत पाटलांचं वक्तव्य

म्हात्रे यांचे म्हणणे ऐकून घेण्याची आंदोलकांची मानसिकता नव्हती.  तत्पूर्वी, होटगी रस्त्यावर भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन सकल मराठा समाजाने घेराव घातला. माऊली पवार, हेमंत पिंगळे व इतरांनी इमदार देशमुख यांना खडे बोल सुनावत तातडीने मुंबईत जाऊन सरकारला मराठा आरक्षण देण्यास भाग पाडावे, उपोषण करणारे जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीचे बरेवाईट झाल्यास त्याची शासनाला मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला. मराठा आरक्षणासठी जिल्ह्यात पाचशेपेक्षा जास्त गावांमध्ये आंदोलन पेटले असताना त्यात मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी इतर बहुजन समाजासह मुस्लीम समाजही पुढे सरसावत आला आहे. सोलापुरात सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी वारकरी सांप्रदाय संघटनेने भजन आंदोलन केले. त्यावेळी माजी महापौर आरीफ शेख, छत्रपती शिवाजी मुस्लीम ब्रिगेडचे मतीन बागवान व इतर कार्यकर्ते   डोक्यावर पारंपारिक नमाजी टोप्या परिधान करून गळ्यात टाळ घेऊन भजनात तल्लीन झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.