Suresh Dhas on Walmik Karad: बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सीयाडीकडे सोपविल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरली. आता खंडणी प्रकरणात आरोपी असलेले वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. यानंतर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. “राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखविल्यामुळे शेवटी वाल्मिक कराड यांना सीआयडीसमोर शरण यावे लागले. त्याबद्दल मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. यापुढे आता ‘आका’ची संपत्ती जप्त झाली पाहीजे, त्याशिवाय या प्रकरणातील सत्य बाहेर येणार नाही. जर हा निर्णय घेतला नाही, तर आम्हाला वेगळा मार्ग अवलंबवा लागेल”, असे सुरेश धस म्हणाले.
माध्यमांशी बोलत असताना सुरेश धस म्हणाले, “सुदर्शन घुले, प्रतीक घुले या दोन आरोपींनी संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केली होती. त्यामुळे त्यांनाही लवकरात लवकर अटक करावी. तसेच या दोघांनी व्हिडीओ कॉल करून अटकेतील आरोपी विष्णू चाटे यांना मारहाण कशी होत आहे, हे दाखविले होते. तसेच आता शरण आलेल्या आकालाही व्हिडीओ कॉल केला असल्याचे समोर आले तर त्यांच्यावरही हत्येशी संबंधित गुन्हा दाखल करण्यात यावा.”
गुन्हेगार कधीच गुन्हा मान्य करत नाही
वाल्मिक कराड यांनी स्वतःवरील आरोप एका व्हिडीओद्वारे फेटाळून लावले आहेत. यावर बोलत असताना सुरेश धस म्हणाले की, अफझल गुरू, अजमल कसाब यांनीही स्वतःचा गुन्हा मान्य केला नव्हता. कोणताही गुन्हेगार स्वतःचा गुन्हा कबूल करत नाही. पण पोलिसांनी कोठडीत घेतल्यानंतर त्यांना गुन्हा सिद्ध करावा लागतो. त्याप्रमाणे पोलिस तपासात सत्य बाहेर येईल, अशी आमची अपेक्षा आहे.
राजकीय द्वेषाच्या आरोपाबाबत प्रत्युत्तर
वाल्मिक कराड यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना राजकीय द्वेषापोटी लक्ष्य केल्याचे सांगितले. या प्रश्नावर बोलत असताना आमदार सुरेश धस म्हणाले की, या विधानाला काहीही अर्थ नाही. आम्ही काय संतोष देशमुख यांचा खून करा, असे सांगितले होते का? आका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खंडणीसाठी हे गुन्हे केले आहेत. यात राजकारणाचा काहीही संबंध नाही.
हे ही वाचा >> वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर संतोष देशमुखांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया…
तर मी शिक्षा भोगायला तयार – कराड
दरम्यान वाल्मिक कराडने शरण येण्यापूर्वी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. ज्यात त्यांनी म्हटले, “मी वाल्मिक कराड आहे. माझ्याविरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीची खोटी तक्रार दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असतानाही पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी कार्यालयात शरण होत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्यावी. पण राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यात जोडले जात आहे. पोलीस तपासात जर मी दोषी आढळलो तर न्याय देवता जी शिक्षा देईल, ती भोगण्यासाठी मी तयार आहे.”