Walmik Karad in Beed Jail: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना बीड तुरुंगात मारहाण झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. एकीकडे तुरुंग प्रशासनाने अशी कोणतीही मारहाण झाली नसल्याची भूमिका मांडली असताना सुरेश धस यांनी मात्र आपल्याकडे आलेल्या महातीनुसार दोन गटांमध्ये तुरुंगात राडा झाल्याचा दावा केला आहे. त्यात वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेला महादेव गिते व अक्षय आठवले यांच्या टोळीकडून मारहाण झाल्याचं सांगितलं जात आहे. यासंदर्भात सुरेश धस यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले सुरेश धस?

फोन करण्यावरून दोन टोळ्यांमध्ये राडा झाला आणि त्यातून वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना मारहाण झाल्याचा दावा सुरेश धस यांनी यावेळी केला आहे. “दोन टोळ्यांमध्ये वाद झाल्याचं मला समजलंय. प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगत आहे. पण हा वाद मुख्य दोन टोळ्यांमध्ये झालाय. बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं. माझी तर माहिती आहे की आकांना स्वतंत्र जेवणही दिलं जातंय. एक स्पेशल फोन आहे ज्यावरून आकांचं थेट कनेक्शन परळीतल्या कोणत्यातरी फोनशी होतं ही माहिती मला मिळाली आहे”, असं सुरेश धस पत्रकार परिषदेत म्हणाले.

“एसपींनी लक्ष ठेवायला हवं होतं. मुख्यालयात असूनही कैद्यांना व्हिआयपी ट्रीटमेंट दिली जात होती. प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थिती का नाही पाहिली? हे बाहेर हत्या करून थकलेत, ते आत जाऊन हत्या करणार नाहीत हे कशावरून?”, असा सवालही धस यांनी उपस्थित केला.

कुठल्या बॅरेकमध्ये कुणाला ठेवलंय?

दरम्यान, पाच क्रमांकाच्या बॅरेकमध्ये महादेव गिते, सहामध्ये अक्षय आठवले तर नऊमध्ये वाल्मिक कराडला ठेवल्याचं सांगितलं जात आहे. जेवणासाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी या आरोपींना बाहेर आणलं असता तेव्हा ही हाणामारी झाली असावी, असा अंदाज सुरेश धस यांनी मांडला आहे.

“तुरुंगात कर्मचारी कमी आहेत तर अधिकाऱ्यांनी काही आरोपी अमरावती, नागपूर, नाशिक, संभाजीनगर इथल्या तुरुंगात पाठवायला हवं होतं. अनेक आरोपी लातूर तुरुंगच का मागतात? कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर किंवा बीड तुरुंगात काम करतात हे तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती नसतं का?” असा सवालही धस यांनी उपस्थित केला.

“आका किंवा त्यांच्या समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? शोलेमध्ये आम्ही पाहिलंय की अधिकारी म्हणतात ‘जेल के कोने कोने में हमारे जासूस है’. मग हे जासूस काय करत होते? कालिया चित्रपटात आम्ही तुरुंगात झालेल्या हाणामाऱ्या पाहिल्या होत्या आम्ही. आता बीडच्या तुरुंगात कालिया तयार झालाय की काय कुणास ठाऊक”, असंही धस म्हणाले.