Suresh Dhas On Jitendra Awhad : परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणासंदर्भात बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करत त्यांच्या एका विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडीओत परभणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत हा आग्रह धरू नका असं सुरेश धस म्हणत असल्याचं दिसत आहे. मात्र, यावरून जितेंद्र आव्हाड यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘बदलापूरच्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेची बाजू घेणारे आणि वाहवा करणारे जितेंद्र आव्हाड मोठे संत आहेत’, असा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला आहे.
सुरेश धस काय म्हणाले?
“परभणीपासून जो लॉग मार्च निघाला होता तो लॉग मार्च जवळपास २५ दिवस सुरु होता. मग आमदार जितेंद्र आव्हाड यांना मला एकच विचारायचं आहे की तु्म्ही त्या २५ दिवसांत एकदा तरी त्यांच्याशी संपर्क केला का? मी तरी त्यांच्याबरोबर होतो. मात्र, हे आंदोलन कुठेतरी थांबवलं पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन एखाद्या प्रश्नावर मार्ग काढणे जर चूक असेल तर मी ती चूक केली आहे”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
“जितेंद्र आव्हाड आता लॉग मार्च झाल्यानंतर बोलत आहेत. मात्र, त्यांनी माहिती घेतली पाहिजे. तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केला. पण माझ्याबरोबर नेहमी दलित बांधव असतात. त्यामुळे मला जितेंद्र आव्हाडांनी कनवाळा दाखवण्याची आवश्यकता नाही. जितेंद्र आव्हाडांनी संत वैगेरे असा शब्द वापरला. मात्र, बदलापूरमध्ये ज्या चिमुकलीवर अत्याचार झाला, अतिशय दुर्देवी घटना घडली, त्या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेची वाहवा करणारे तु्म्ही राष्ट्रीय संत असाल तर ते तुम्हालाच लखलाभ. अक्षय शिंदेची वाहवा करणं म्हणजे हे कोणत्या विचाराचे आहेत आणि हे राजकारणासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात? याचं प्रमाणपत्र देण्याची आवश्यता नाही. जितेंद्र आव्हाडांनी दुसऱ्यांना शिकवण्याच्या गप्पा करू नये”, असा हल्लाबोल सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला.