MLA Suresh Dhas On Deenanath Mangeshkar Hospital : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या एका घटनेवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. एका गर्भवती महिलेवर उपचार करण्यासाठी १० लाखांची अनामत रक्कम मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत तनिशा भिसे या महिलेचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देखील भाष्य करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. सध्या अनेक रुग्णालयांत लाखो रुपयांची बिलं येतात, ही परिस्थिती भयावह असून सर्व सामान्य माणसांनी जगायचं कसं? असा संतप्त सवाल सुरेश धस यांनी केला आहे.
सुरेश धस काय म्हणाले?
“सध्या कोणत्याही रुग्णालयांचे बिलं अमर्याद होत आहेत, म्हणजे गरिबांनी आजारी पडावं की नाही? इथपर्यंत विचार मनात आणण्याएवढी परिस्थिती निर्माण झाली आहे. काल पुण्यातील घटना घडली, त्या घटनेत रुग्णाला १० लाख रुपये भरण्यास सांगितले. या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की समिती नेमली जाईल. मला वाटतं आता पुढच्या चार दिवसांत समिती स्थापन होईल आणि कार्यवाही होईल”, असं सुरेश धस यांनी म्हटलं.
अनेक लोकांवर रुग्णालयांच्या बाबतीत अन्याय झालेले आहेत. विशेषत: मेडिकलच्या बाबतीत माझी तक्रार होती. एखादी ६० रुपयांची टॅबलेट सहा हजारांना मिळायला लागली तर गरिबांनी काय करायचं? आमदार योगेश सागर ते काही रुग्णालय चालवतात. त्यांनी मला खासगीत बोलताना सांगितलं ६० रुपयांची गोळीची किंमत ग्राहकापर्यंत जाईपर्यंत सहा हजार रुपये होते.या संदर्भातील मुद्दा मी देखील मांडला होता. आता काही रुग्णालयांचे मालक असतात त्यांच्या रुग्णालयात त्यांच्या मेव्हण्यांचं मेडिकल असतं. मग हे कसं होतं? काही ठराविक डॉक्टर ठराविक कंपण्यांचे औषधे प्रेफर करतात. या सर्व गोष्टींचा समितीने विचार केला पाहिजे”, असंही आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
“सध्या जे काही प्रकार चालले आहेत, म्हणजे रुग्णालयांचं बिलं किती येतात? हे सर्व भयावह आहे, मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीने याची चिरफाड केली पाहिजे. तसेच पुण्याच्या घटनेत जर मुख्यमंत्री कार्यालयाचे फोन येऊन देखील दखल घेतली गेली नसेल तर रुग्णालय प्रशासनाला एवढी मुजोरी कशी? हा देखील प्रश्न आहे. आम्ही देखील अनेक लोकांसाठी लढत असतो. आम्हाला देखील डॉक्टरांना अनेक फोन करावे लागतात. एखाद्या व्यक्तीला सवलत मिळून द्यायची असेल तर पाच-पाच डॉक्टरांना फोन करावे लागतात. तेव्हा कुठे एखादा डॉक्टर होकार देतो”, असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं.