Suresh Dhas On Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे, तर एक आरोपी अद्यापही फरार आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. दरम्यान, आता वाल्मिक कराडवरही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर परळीत वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा लावल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली होती. तसेच काही ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे परळीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, यावर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. ‘आरोपीसाठी शहर बंद ठेवायचं, दुकाने बंद करायची, आरडाओरडा करायचा, असा नवीन परळी पॅटर्न आता सुरु झाला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा’, असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

सुरेश धस काय म्हणाले?

“परळी बंद करणं शक्य आहे का? नाविन्यपूर्ण योजना हा परळीचा पॅटर्न महाराष्ट्राने पाहावा. कारण कोणत्याही आरोपीला जर त्याच्यावर करण्यात आलेल्या आरोपांनुसार किंवा गुन्ह्यांत पोलिसांनी ताब्यात घेतलं तर शहरे बंद करायची, दुकाने बंद करायची, आरडाओरडा करायचा, शहर बंद करायचं, असा एक नवीन पॅटर्न कालपासून परळीत झाला. मात्र, अशा प्रकारच्या दबावाला कोण विचारतं? व्यापारी त्यांचंच नुकसान करत आहेत. मकर संक्रातीचा काल बाजार बंद केला होता ना? हा जातीवाद नाही तर हा गुडांडवाद आहे”, असं सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

“वाल्मिक कराड यांना मानणारे ४ ते ५ टक्के लोकांचा हा गुडांडवाद आहे. त्यामुळे जातीवाद हा शब्द वापरला नाही पाहिजे. आता बीडमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक दिलेले आहेत. त्यामुळे बीडच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षकांनी काय-काय कारवाई केली ते आम्ही विचारणार आहोत”, असंही सुरेश धस यांनी म्हटलं.

दरम्यान, वाल्मिक कराडच्या पत्नीने काही सवाल उपस्थित केले होते. तसेच हत्येचा संबंध का जोडत आहात? आमच्या दोन नेत्यांना आणि आमच्या समाजाला संपवायचं आहे का? असे सवाल वाल्मिक कराडच्या पत्नीने केले होते. यासंदर्भात बोलताना सुरेश धस यांनी म्हटलं की, “मी त्या माउलीच्या विरोधात बोलणार नाही. कारण एखाद्या महिलेबाबतीत बोललं की मुद्दा भरकटला जातो. मात्र, माझी विनंती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा. यामध्ये अजून बरंच काही आहे. आता आका सापडला आहे, तर आकाच्या पुढे अजून काही कडी सापडतेय का? ते पाहावं लागेल. आकाच्यावरची माणसेही त्यामध्ये सापडणार आहेत. तसेच या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती देखील बाकी आहे”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla suresh dhas on santosh deshmukh murder case and parali walmik karad mcoca and beed police gkt