Suresh Dhas : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणात मनोज जरांगे पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यासह अजून काही जणांनी या प्रकरणावरून चांगलाच आवाज उठवला. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे संबंध असल्याचा मुद्दा या नेत्यांकडून उपस्थित करण्यात आला. यावरून भाजपाचे नेते सुरेश धस यांनी अनेकदा टीका केली. मात्र, आता सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती समोर आली. यावरून आता चांगलंच राजकारण तापलं आहे.
यावरून राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. यानंतर स्वत: सुरेश धस यांनी या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याचे मान्य करत आपण त्यांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रियेनंतर तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटल्याचं स्पष्टीकरण दिलं. मात्र, यानंतर आज माध्यमांशी बोलताना सुरेश धस यांनी एक गंभीर आरोप केला आहे. “माझ्याविरोधात कोणीतरी षडयंत्र रचतंय”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे. तसेच आपण या षडयंत्राचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचा इशाराही सुरेश धस यांनी दिला आहे.
सुरेश धस काय म्हणाले?
“दोन गोष्टी काल एकत्र केल्या गेल्या. त्यामध्ये एक म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांना भेटायला गेलो. या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांची काल त्याबाबतीमधील प्रतिक्रिया झाली. त्यानंतर धनंजय मुंडेंना मी भेटल्याचंही टिव्हीवर आलं किंवा ते लीक करण्यात आलं. याबाबत माझं असं मत आहे की याबाबत कोणीतरी व्यवस्थित माझ्याविरोधात षडयंत्र रचतंय. हे षडयंत्र कोण रचतंय हे देखील मला माहिती आहे. ही गोष्ट मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे. तसेच हे जे कोण षडयंत्र रचतंय त्याचा पर्दाफाश मी योग्यवेळी करणार आहे”, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.
“धनंजय देशमुख आणि मस्साजोगकर यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी ठामपणे माझ्यावर विश्वास दाखवला. धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये माणुसकी सोडली. आमची अपेक्षा होती की धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायला हवी होती. पण धनंजय मुंडेंही भेटायला आले नाहीत, पंकजा मुंडे देखील भेटायला आल्या नाहीत. पण आम्ही माणुसकी सोडलेली नाही, आम्ही माणुसकी म्हणून भेटायला गेलो. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये मी काल, आज आणि उद्याही माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे”, असं आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.