Suresh Dhas Speech: पंकजा मुंडे यांनी अद्याप संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट का नाही घेतली? असा सवाल बीडच्या मोर्चात उपस्थित करत भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी मुंडे बहीण-भावावर जोरदार टीका केली. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन बरेच दिवस लोटले तरी अद्याप प्रमुख आरोपींना अटक झालेली नाही. यासाठी आज बीड शहरात सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात विविध पक्षांचे आमदार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सामान्य लोक सामील झाले होते. यावेळी सर्वांचाच रोख धनंजय मुंडे यांच्या कार्यशैलीकडे होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तर थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
पंकुताई तुमची जी हुजूरी करणार नाही
यावेळी आमदार सुरेश धस म्हणाले, १२ डिसेंबर रोजी तुम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीसाठी तुम्ही गोपीनाथ गडावर आला होतात. पण वाकडी वाट करून तुम्ही संतोष देशमुखच्या घरी का नाही गेलात? गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या काळात मटक्याचा खटका बसवला. मुंबईतील गँगवॉर उध्वस्त केलं. त्यांच्याबरोबर मी १० वर्ष काम केलं. पण तुमच्याबरोबरचा अनुभव वेगळा आहे. पंकजा मुंडेंना चांगले माणसं नकोत. त्यांना जी हुजूरी करणारी माणसं लागतात. आमची अवलाद जी हुजूरी करणारी नाही. भले राजकारणातून बाजूला जाऊ.
हे ही वाचा >> Prajakta Mali vs Suresh Dhas: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
धनुभाऊंनी पंकुताईंचं सगळंच काढून घेतलं
“बीडमध्ये अवैधरितीने वाळू आणि राख वाहून नेली जाते. अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्यांना पिस्तुल दाखवली जाते. अशाप्रकारचं वातावरण बीडमध्ये आहे. चार अधिकाऱ्यांचं त्यांच्यासमोर काय चालणार? एक रुपयाही सरकारला न देता २००२ पासून फुकट राख उचलली जात आहे. पंकजा मुंडे २०१४ ते २०१९ मध्ये सत्तेत होत्या. तरीही हे का बंद झाले नाही?”, असाही सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला. याचं कारण सांगताना सुरेश धस पुढं म्हणाले, परळीत धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे. राख-रेती उचलणआरे लोक सकाळी चहाला खाली असतात, नाश्त्याला वर असतात. पंकुताई तुमचं सगळंच धनुभाऊंनी काढून घेतलं, तुम्हाला मेळच लागला नाही.
धनंजय मुंडेंचे मंत्रीपद काढून घ्या
सर्वपक्षीय मोर्चात धनंजय मुंडे यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंकेही सामील झाले होते. संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आणि आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावे, अशी मागणी प्रकाश सोळंके यांनी केली. गेल्या पाच वर्षांत धनंजय मुंडे हेच पालकमंत्री होते. तेव्हा पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री पद भाड्याने दिले. ते वाल्मिक कराड यांनाच भाड्याने दिले होते. त्यांनी या माध्यमातून बीड जिल्ह्यात जरब बसविली, असाही आरोप प्रकाश सोळंके यांनी केला.