Suresh Dhas on Dhananjay Munde: बीडमधील केज तालुक्याच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरख धंद्याला चाप बसवावा या मागणीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधत असताना सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. तसेच परळीत राजकारणाचे इव्हेंट मॅनेजमेंट झाले असल्याचे सांगून परळी पॅटर्नचाही उल्लेख सुरेश धस यांनी केला. यावेळी त्यांनी सपना चौधरी, प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांचा उल्लेख केला.
परळीत अनेक गायरान जमिनींवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला. विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. त्यातून इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. यासाठी सपना चौधरी, रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी यांना इथे आणले जाते. जर कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा, अशीही खोचक टीका सुरेश धस यांनी केली.
हे वाचा >> मुंडे बहीण-भाऊ विरुद्ध सुरेश धस, निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नवा वाद
प्राजक्ताताई माळीही परळीत येतात…
सुरेश धस पुढे म्हणाले, “जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.” सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रिटी परळीत येत असतात त्यांच्या तारखा कशा मिळविल्या जातात, याबाबतही सुरेश धस यांनी भाष्य केले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर या प्रकरणाला आक्रमकपणे उचलून धरणाऱ्या नेत्यांमध्ये सुरेश धस सर्वात पुढे आहेत. आज पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असताना त्यांनी या हत्या प्रकरणातील आका कुठे, कुठे फिरत आहे, याची माहिती पोलिसांना दिली असल्याचे सांगितले. या आकांचा सहभाग ३०२ च्या गुन्ह्यात आहे, असाही आरोप त्यांनी केला.