लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : कांदा बाजारासाठी संपूर्ण राज्यासह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मागील सहा वर्षे या समितीच्या सभापतिपदाचा कारभार सांभाळलेले भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदा मात्र या निवडणुकीत न उतरण्याची भूमिका घेतली आहे. तर त्यांच्याच पक्षाचे असलेले सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी या दोन्ही आमदारांनी निवडणुकीत स्वतःचे पॅनेल उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने त्यांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेतेही सक्रिय झाले आहेत.

वार्षिक सुमारे १८०० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल करणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न समितीला मागील वर्षभरात वाढीव मुदतवाढ मिळाली होती. निवडणुकीच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी होऊन त्यात निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

१९६२ साली दिवंगत सहकार नेते, माजी आमदार वि. गु. शिवदारे यांनी स्थापन केलेल्या आणि सुरुवातीपासून काँग्रेस व अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीच्या ताब्यात राहिलेल्या या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताकाळात गेल्या सहा वर्षांत समीकरणे बदलली आहेत. विशेषतः २०१४ साली राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी वाढल्याचे पाहायला मिळते. यापूर्वी २०१७ साली झालेल्या निवडणुकीत तर सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी तथा तत्कालीन सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख हे दोघे थेट आपापल्या पॅनेलच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. यात बाजार समितीचे नियंत्रण असलेल्या सहकार व पणन खात्याचे मंत्री असूनही सुभाष देशमुख यांना पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती.

गेल्या सहा वर्षांत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पदराखाली सत्ताधारी महाविकास आघाडी या बाजार समितीमध्ये कार्यरत आहे. परंतु, यंदा आमदार विजयकुमार देशमुख यांनी कृषी बाजार समितीपासून दूर राहणे पसंत केले आहे. त्यांच्या पश्चात महाविकास आघाडीमधील वजनदार नेते म्हणून लौकिक असलेले माजी आमदार दिलीप माने यांनी समविचारी मंडळींची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्यांना इतर नेते मंडळी कसा प्रतिसाद देतात, यांचे चित्र येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

दुसरीकडे सोलापूर दक्षिणचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख आणि अक्कलकोटचे याच पक्षाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही ताकद पणाला लावत ही प्रतिष्ठेची कृषी बाजार समिती ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखायला सुरुवात केली आहे. यात महाविकास आघाडीतील दिलीप माने विरोधकांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते. १८ जागांसाठी या निवडणुकीत २७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.